गडचिरोली दि.18 : महाराष्ट्रातील धानाची खरेदी किंमत पाहून चुकीच्या पध्दतीने शेजारील राज्यातून कमी प्रतीचे धान आणले जाते. यातून राज्यातील शेतकऱ्यांचे नुकसान होते. यावर पोलीस यंत्रणा तसेच जिल्हा प्रशासनाने योग्य तपासणी करून संबंधितांवर कडक कारवाई करावी असे निर्देश राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी गडचिरोली येथे दिले. ते गडचिरोली येथे दौऱ्यावर असताना जिल्हास्तरीय आढावा बैठकीत बोलत होते. जिल्ह्यात धान उत्पादन जास्त असून बाहेरील धान जिल्हयात चोरून आल्यास, येथील धान खरेदी आणि साठवणूकीवर ताण येतो, राज्य शासनाचा पैसा वाया जातो. त्यामूळे परराज्यातील धानावर कारवाई करून आपल्या शेतकऱ्यांचे धान शंभर टक्के खरेदी केंद्रांवर पोहचेल यासाठी नियोजन करा अशा सूचनाही त्यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या. या आढावा बैठकीला आमदार धर्मरावबाबा आत्राम, आमदार डॉ.देवराव होळी, जिल्हाधिकारी संजय मीणा, पोलीस अधीक्षक अंकित गोयल,नागपूर विभागाचे पुरवठा उपायुक्त रमेश आडे,जिल्हा पुरवठा अधिकारी नरेंद्र भागडे, टीडीसीचे प्रादेशिक व्यवस्थापक गजानन कोटलावार, वैधमापन विभागाचे सहनियंत्रक बिरादार, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी विजय सहारे उपस्थित होते.
मागील वर्षी धान साठवणूकीला, भरडाईला मोठ्या अडचणी आलेल्या होत्या, मात्र यावेळी जिल्हयात चांगले नियोजन झाले असल्याचे त्यांनी सांगितले. टीडीसी साठी खरेदी केंद्रालगत आवश्यक गोदामे उपलब्ध होण्यासाठी गरजेनुसार तालुकानिहाय प्रस्ताव सादर करावेत असे निर्देश मंत्री भुजबळ यांनी संबंधित विभागास यावेळी दिले. राज्य शासन अन्न, नागरी पुरवठा मधून धान्य वाटपाबरोबर धान खरेदीबाबत करोडो रूपये खर्च करत असते. यासाठी या योजनांची अंमलबजावणी योग्य पद्धतीने करा. यातून गरजू नागरिक व आपल्याच शेतकऱ्यांना फायदा होईल. म्हणून धान भरडाई वेळेत न करणाऱ्या मीलसह परराज्यातील धान आणणऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे असे त्यांनी यावेळी सांगितले. यासाठी मनुष्यबळ कमी असल्यास रीक्त पदावरील भरतीबाबत विशेष बाब म्हणून काय करता येईल यासाठी प्रस्ताव सादर करा. दुर्गम भागात या विभागातील पदे रीक्त असता कामा नयेत अशा त्यांनी विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या. नक्षलग्रस्त भागात स्थानिकांना रोजगार व शेतीमधील उत्पादनाला सुयोग्य मोबदला मिळाला तर त्यांच्या कुटुंबांचा प्रश्न सुटेल. यातून जिल्हयातील नक्षलवादही आटोक्यात आणता येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शिवभोजन योजनेत गुणवत्ता राखा – शिवभोजन योजनेतील जेवण खाणारे व विकणारे दोन्ही गरजू आहेत. राज्य शासनाची ही योजना सर्वसामान्यांसाठी अतिशय महत्त्वाची असून यामध्ये गुणवत्ता कायम राखा असा सल्ला त्यांनी प्रशासनाला दिला. शिवभोजन देणाऱ्या पुरवठादारांबाबत काही तक्रारी असतील तर त्यांना बदलून योग्य पुरवठादाराची निवड करावी. शिवभोजन केंद्रावर चांगल्या व्यवस्थेसह, स्वच्छता, ताजे अन्न असावे. यासाठी केंद्रांची पाहणी करता का याबाबतही त्यांनी विचारणा केली. जिल्हयात सद्या 15 शिवभोजन केंद्र कार्यरत आहेत. दर दिवशी 1220 शिवभोजन थाळयांचा इष्टांक देण्यात आला आहे. राज्यात येत्या काही दिवसात थाळयांची संख्या वाढविण्यासाठी नियोजन केले जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
रेशन दुकाने महिला यशस्वीरीत्या चालवतील : राज्यात मोठया प्रमाणात रेशनींगची दुकाने महिला बचत गटांकडून चालविली जातात. जिल्हयातही मोठया प्रमाणात पात्रतेनुसार महीला बचत गटांना दुकाने चालविण्यास द्यावीत अशा सुचना मंत्री भुजबळ यांनी बैठकीत दिल्या. गडचिरोली जिल्हयात 1196 रेशन दुकाने कार्यरत असून दोन्ही प्रकारच्या कार्डधारकांची संख्या एकुण 2,10,658 इतकी आहे असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी यावेळी दिली. सद्या नवीन रेशन दुकानांसाठी 170 गावांमधून 330 अर्ज आले आहेत त्याची छानणी सुरू असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.