मुंबई दि. 15 : औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यात मानवी वस्त्यांमध्ये व शेतात घुसून धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला पकडून तातडीने जेरबंद करण्याचे निर्देश वनमंत्री संजय राठोड यांनी दिले. बिबट्याचा त्वरित बंदोबस्त करण्यासंदर्भात रोजगार हमी योजना मंत्री संदिपान भुमरे यांनी वनमंत्री श्री.राठोड यांची प्रत्यक्ष भेट घेतली. याची तातडीने दखल घेत वनमंत्री संजय राठोड यांनी विधान भवनात बैठक घेतली व हे निर्देश दिले.
पैठण तालुक्यात काही दिवसांपासून एका बिबट्याने धुमाकूळ घातला असून त्याच्या हल्ल्यात आतापर्यंत एक वयोवृद्ध आणि त्यांच्या नातवाचा मृत्यू झाला. तसेच काही जनावरेही मृत्युमुखी पडली आहेत. या पार्श्वभूमीवर या भागात तातडीने पथके नेमावीत, बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरे, ट्रॅप कॅमेरे, थर्मल कॅमेरे लावण्यात यावे तसेच आजूबाजूच्या जळगाव आणि नाशिक या जिल्ह्यांमधूनही अतिरिक्त पथके व रसद मागविण्यात यावी, असे निर्देशही वनमंत्री श्री. राठोड यांनी दिले .