शेततळे व फळबाग लागवडीचे उद्दीष्ट कालमर्यादेत पूर्ण करण्याचे निर्देश

राज्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत जवळपास 38 हजार हेक्टर इतकी विक्रमी फळबाग लागवड झाली आहे. ही समाधानाची बाब असताना त्या तुलनेत जिल्ह्यातील आकडेवारी समाधानकारक नसल्याने मंत्री श्री. भुसे यांनी शेततळे व फळबाग लागवडीचे उद्दीष्ट विहीत कालमर्यादेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची आढावा बैठक शासकीय विश्रामगृह मालेगाव येथे मंत्री श्री.भुसे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी बाजार समितीचे सभापती राजेद्र जाधव, उपसभापती सुनील देवरे, अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) नितीन मुंडावरे आदी उपस्थित होते.

आयोजित आढावा बैठकीमध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत शेततळे, फळबाग लागवड याविषयी चर्चा करण्यात आली. यामध्ये तालुक्यात कृषी विभागाने सन 2020 केवळ 10.60 हेक्टरवर लागवड केल्याची, तर 2021 मध्ये 138 शेततळे मंजूर असून केवळ 26 कामांना मंजुरी मिळाल्याची माहिती देण्यात आली. मालेगाव तालुक्यामध्ये या योजनेतंर्गत शेततळे आणि किमान 1 हजार हेक्टरवर फळबाग लागवड करण्याच्या सुचना कृषी विभागास देण्यात आल्या. येत्या 8 दिवसात सर्व शेतकऱ्यांचे प्रस्ताव तातडीने मंजूर करावेत. चालू हंगामात शेतकरी बांधवांना शेततळ्याच्या पाण्याचा फायदा होईल या दृष्टीने नियोजन करावे. मागील दोन वर्षापासून डाळींब लागवडीची शेतकऱ्यांना गरज असून त्यानुसार लागवड करण्यात यावी. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गतची कामे करत असताना कृषी विभागास महसूल व ग्रामविकास विभागाने सहकार्य करावे आणि कृषी विभागाच्या अडचणी सोडविण्यासाठी दरमहा झालेल्या कामांचा आढावा घेण्याच्या सुचनाही मंत्री श्री.भुसे यांनी यावेळी दिल्या.

गगनभरारी समुहाचा एक हात मदतीचा

सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी उदात्त भावनेच्या व्यक्ती एकत्र आल्या की खूप मोठे काम करु शकतात. याची प्रचिती नुकतीच मालेगावातील गगनभरारी समुहाच्या महिला शिक्षकांनी पूर्णत्वास नेलेल्या एका कार्यातून आली. कोविड रूग्णांसाठी, नेब्युलायझर, पल्स ऑक्सिमीटर, स्टिमर, संपर्कासाठी फोन आणि म्युझिक सिस्टम व इतर आवश्यक साहित्य घेण्यात आले. या साहित्याचे मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते कोवीड सेंटरला हस्तांतर करण्यात आले.