चाळीसगाव शहरासह ठिकठिकाणच्या पाहणीत ग्रामस्थांशी साधला संवाद
चाळीसगाव शहरासह तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती आणि पशुधनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. महसूल विभागातर्फे नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत. मात्र, पुरास कारणीभूत आणि पर्यावरणाची हानी पोहोचविणारे नदी पात्रातील अतिक्रमित आणि विना परवानगी केलेले बांधकाम काढण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला देण्यात येतील, अशी माहिती राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकासमंत्री जयंत पाटील यांनी दिली.
चाळीसगाव शहरासह तालुक्यात 30 ऑगस्ट, 2021 रोजीच्या मध्यरात्रीनंतर झालेल्या अतिवृष्टीमुळे तितूर आणि डोंगरी या नद्यांना पूर आले. त्यात एक महिला वाहून गेली, तर शेकडो जनावरे वाहून गेली तर काही जनावरांचा जागेवरच मृत्यू झाल्याने पशुधनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर जलसंपदा मंत्री श्री. पाटील यांनी आज सकाळी चाळीसगाव शहरासह तालुक्यातील वाघडू, वाकळी, रोकडे, रोहले तांडा या गावांना भेट देवून तेथील पूर परिस्थितीची पाहणी करून नागरिकांसह शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पंचायत समिती सभापती अजय पाटील, उपविभागीय अधिकारी लक्ष्मीकांत साताळकर, तहसीलदार अमोल मोरे, गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर, माजी आमदार राजीव देशमुख, ॲड. रवींद्र पाटील, जिप सदस्य शशिकांत साळुंखे, दिनेश पाटील, श्याम देशमुख आदी उपस्थित होते.
जलसंपदा मंत्री श्री. पाटील यांनी सांगितले, अतिवृष्टीमुळे शेती खरडून निघाली आहे, तर पशुधनाची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. मृत पशुधनाची विल्हेवाट लावण्यात आली आहे. नदी पात्रात केलेल्या अतिरिक्त, अतिक्रमित आणि विना परवानगी बांधकामामुळे पुराची दाहकता वाढल्याचे भेटी दरम्यान नागरिकांनी सांगितले. त्यामुळे अतिक्रमित आणि विना परवानगी केलेले बांधकाम काढण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांना देण्यात येतील असे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत. याबाबत अहवाल प्राप्त झाल्यानंतर मंत्रिमंडळाच्या अलीकडच्या निर्णयानुसार मदत करण्यात येईल. काही गावांमध्ये नदी, नाला काठावर आवश्यकतेप्रमाणे संरक्षक भिंत उभारण्यात येईल. त्यामुळे नागरिकांचे पुरापासून संरक्षण होण्यास मदत होईल. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. शासकीय यंत्रणांकडून सतर्कतेबाबत वेळोवेळी सूचना देण्यात येतात. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही, असेही जलसंपदा मंत्री श्री. पाटील यांनी ग्रामस्थांशी संवाद साधताना सांगितले.