Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

जेव्हा कृषीमंत्र्यांकडून विमा कंपनी कार्यालयाची होते तपासणी…

शेतकऱ्यांच्या तक्रारींची दखल न घेणाऱ्या विमा कंपनीवर गुन्हा दाखल करा – कृषीमंत्री दादाजी भुसे यांचे सुस्पष्ट निर्देश

पीक विमा मिळण्यासाठी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी अर्ज करूनही विमा कंपनीकडून त्यावर कार्यवाही न झाल्याच्या तक्रारीची तातडीने दखल घेऊन कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी थेट विमा कंपनीच्या कार्यालयात जाऊन तेथील व्यवस्थेची तपासणी केली. कंपनीच्या कार्यालयात निकषानुसार यंत्रणा व व्यवस्था आढळली नाही. या कंपनीविरुद्ध तत्काळ तक्रार दाखल करण्याचे निर्देश कृषी मंत्र्यांनी यावेळी दिले.

अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी कृषी मंत्री अमरावती जिल्हा दौऱ्यावर आहेत. अमरावती जिल्ह्यातून पीक विमा योजनेत सहभागी ३ हजार २९१ नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांनी विमा कंपनीकडे अर्ज केले. तथापि, इफकोटोकियो जनरल इन्शुरन्स कंपनीकडून याबाबत कार्यवाही होत नसल्याची तक्रार प्राप्त होताच कृषी मंत्र्यांनी थेट स्वतः कार्यालयाची तपासणी करण्याचा निर्णय घेतला व जिल्हाधिकारी, तसेच इतर अधिकाऱ्यांसह कंपनीचे कार्यालय गाठले.

कंपनीच्या कार्यालयात  कामकाजासाठी आवश्यक यंत्रणा आढळून आली नाही. एका गोदामसदृश कक्षात कंपनीचे कार्यालय असल्याचे आढळले. कार्यालय व इतर यंत्रणाही सुस्थितीत नसल्याचे दिसून आले. शेतकरी बांधवांना विमा प्राप्त होण्यासाठी योग्य कार्यवाही होत नसल्याचे दिसून आले. प्रतिनिधीकडून समाधानकारक उत्तर मिळाले नाही. या कंपनीविरुद्ध तातडीने गुन्हा दाखल करण्याचे निर्देश कृषी मंत्री श्री. भुसे यांनी दिले. याबाबत त्यांनी कृषी सचिव एकनाथ डवले यांच्याशीही भ्रमणध्वनीवरून चर्चा करून निर्देश दिले.

कंपनीविरुद्ध तत्काळ गुन्हा दाखल करावा. कंपनीला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केल्यास कारवाई करू, असा इशाराही मंत्री महोदयांनी दिला.

जिल्हाधिकारी पवनीत कौर, मुख्य कार्यकारी अधिकारी अविष्यांत पंडा यांच्यासह कृषी अधिकारी उपस्थित होते.

Exit mobile version