तलाठी, कृषी सहायक आणि ग्रामसेवकांनी तत्काळ पंचनामे करण्याच्या सूचना
औरंगाबादसह पैठण तालुक्यात काल झालेल्या अतिवृष्टीने शेतीसह अन्य बाबींचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले. या नुकसानीची पाहणी रोहयोमंत्री संदीपान भूमरे आणि जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी प्रत्यक्ष घटनास्थळावर जाऊन आज केली. तसेच बाधित झालेल्या गावांतील नुकसानीचे वस्तुनिष्ठ तलाठी, कृषी सहायक आणि ग्रामसेवकांनी तत्काळ पंचनामे करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचनाही केल्या.
रोहयो मंत्री भुमरे यांनी पाहणी दरम्यान ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेत शासन, प्रशासन तुमच्या पाठिशी खंबीरपणे उभे असल्याचा विश्वास दिला. या नैसर्गिक आपत्ती मधून चांगल्या प्रकारे आपल्याला बाहेर निघायचे आहे. आपणास सर्वतोपरी मदत करणार असल्याची ग्वाही जिल्हाधिकारी यांनी ग्रामस्थांना दिली.
पिंपळगाव पांढरी आणि पांढरी पिंपळगाव, कडेठाण, दाभरूळ, आडगाव जावळी, आंतरवाली, पाचोड, आंतरवाली खांडी, आडगाव जावळे आदी गावांमध्ये पाहणी दरम्यान शेतकऱ्यांच्या शेत पिकांचे झालेले नुकसान व घरात शिरलेले पाणी याचा आढावा घेत त्यांनी गावातील ग्रामस्थांशी संवाद साधला. दाभरूळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, शाळेच्या संरक्षक भिंत आदींची पाहणी करत ग्रामस्थांशी संवाद साधत रोहयो मंत्री भूमरे आणि जिल्हाधिकारी चव्हाण यांनी त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व धीर दिला.