कोरोनाच्या प्रादुर्भावासोबतच म्युकरमायकोसिस या आजाराचे रुग्ण देखील अधिक प्रमाणात आढळून येत आहे. याकरीता कोरोना बाधित व कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांनी म्युकरमायकोसिस या आजारापासून स्वत:ची अधिक प्रमाणात काळजी घ्यावी, असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.
येवला विश्राम गृह येथे कोरोना सद्यस्थिती, उपाययोजना व लसीकरण मोहीम याबाबत निफाड व येवला तालुक्यांची आढावा बैठक घेण्यात आली, त्यावेळी पालकमंत्री श्री. भुजबळ बोलत होते.या बैठकीस पंचायत समिती सदस्य मोहन शेलार, प्रांताधिकारी सोपान कासार, डॉ. अर्चना पठारे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत खैरे, तहसीलदार प्रमोद हिले, शरद घोरपडे, येवला नगरपालिकेच्या मुख्याधिकारी संगीता नांदूरकर, येवला उपजिल्हा रुग्णालयाच्या अधिक्षक डॉ.शैलजा कृपास्वामी, प्रभारी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.शरद कातकाडे, गट विकास अधिकारी डॉ. उन्मेष देशमुख, संदीप कराड, ग्रामीण पोलीस उपअधीक्षक समरसिंग साळवे, तालुका पोलीस निरीक्षक अनिल भवारी, येवला शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी, लासलगाव पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक राहुल वाघ यांच्यासह अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, येवला तालुक्यात कान, नाक व घसा तज्ज्ञ नसल्याने म्युकरमायकोसिसचे बाधित रुग्ण आढळल्यास त्यांना तातडीने नाशिकला उपचारासाठी पाठविण्यात यावे. या आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी व नियोजन पुर्वक उपाययोजना करण्यासाठी जिल्ह्यात म्युकरमायकोसिस बाबत टास्क फोर्सची निर्मिती करण्यात आली आहे. तसेच ऑक्सिजनवर जे रुग्ण आहेत अथवा ज्या रुग्णांनी ऑक्सिजनवर उपचार घेतले आहे अशा रुग्णांची नियमित तपासणी करण्यात यावी. त्याचप्रमाणे ऑक्सिजन जनरेशन प्लँट सुरू झाल्यानंतर ऑक्सिजनचा तुटवड्याचे प्रमाण कमी होणार आहे, असे पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी यावेळी सांगितले.
कोरोना रुग्णांची संख्या कमी होण्याकरीता ब्रेक द चेन च्या अंतर्गत लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा चांगला परिणाम दिसून येत असल्याने लॉकडाऊन नियामांचे काटेकोर पालन करण्यात यावे. याचाच भाग म्हणून शहरी भागातील रुग्णांची संख्या कमी होत असून ग्रामीण भागातील रुग्णसंख्या कमी करण्याच्या दृष्टिने उपाययोजना करण्यात याव्यात. कोरोना संसर्गाचा प्रसार कमी होण्यासाठी आणि गृह विलगिकरणात आवश्यक सुविधा उपलब्ध नसतील अशा बाधित व नव्याने बाधित झालेल्या रुग्णांना गृह विलगिकरणाची परवानगी न देता त्यांना कोविड केअर सेंटर मध्ये दाखल करण्यात यावे. त्याचप्रमाणे लासलगाव येथील कोविड सेंटर तातडीने सुरू करण्यात यावे. ४५ वर्षावरील नागरिकांची लसीकरण मोहीम जलद गतीने राबविण्यासाठी नियोजन करण्यात यावे. नगरपालिकेने पावसाळ्याच्या अनुषंगाने आवश्यक असलेली सर्व कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचनाही पालकमंत्री छगन भुजबळ यांनी संबंधित यंत्रणाना दिल्या आहेत.
येवला शहरात सुरू असलेल्या लॉकडाऊनची केली पाहणी
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भाव कमी करण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आज येवला शहरात प्रत्यक्ष पाहणी करत लॉकडाऊनचा आढावा घेतला. यावेळी प्रथमतः शनी पटांगण येथील भाजी बाजार परिसर येथून पाहणी सुरवात करून येवला शहरातील विविध भागातून पाहणी केली. यावेळी शहरात विविध ठिकाणी मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या.
विंचूर येथील कोविड केअर सेंटरचे उद्घाटन
विंचूर येथील देवकी लॉन्स येथे उभारण्यात आलेल्या 50 बेडच्या कोविड केअर सेंटरचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. या कोविड केअर सेंटरमध्ये एकूण २५ ऑक्सिजन व २५ साधारण बेड्सची व्यवस्था करण्यात आलेली असून रुग्णांना आवश्यक सोयी सुविधा पुरविण्यात आलेल्या आहेत.