कोरोनावरील डीएनए आधारित, सुई विरहित स्वदेशी लस झायकोव्ह डी या लसीचे १ कोटी डोस केंद्र सरकारकडे सुपुर्द करण्यात आले आहे. त्यामुळे कोरोनाविरोधातील लढाईत आता चौथ्या लसीची एन्ट्री झाली आहे.
औषध नियंत्रक महासंचालकांनी या लसीला २० ऑगस्ट रोजी आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिली होती. या लसीचा समावेश राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमात करण्यात येणार असल्याचे नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी ३० सप्टेंबर रोजी सांगितले होते.
झायडस कॅडिला या फार्मा कंपनीकडून झायकोव्ह डी या लसीची निर्मिती करण्यात आली आहे. केंद्र सरकारने नोव्हेंबरमध्ये १ कोटी डोसची मागणी नोंदविली होती. कंपनीने ही जगातील पहिली डीएनए आधारित कोरोना लस तयार केली आहे. ही लस ७७ टक्क्यांपर्यंत प्रभावी असल्याचे चाचणीतून स्पष्ट झाले आहे.
केंद्र सरकारने २६५ रुपये प्रतिडोस या दराने या लसीची खरेदी केली आहे. ही लस सुई नसलेल्या एप्लिकेटरच्या साह्याने दिली जाणार आहे. त्यासाठी प्रत्येकी ९३ रुपये जीएसटी व्यतिरिक्त द्यावे लागणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे. त्यामुळे ही लस ३५८ रुपये अधिक कर अशी उपलब्ध होणार आहे. या लसीचे तीन डोस घ्यावे लागणार आहेत. प्रत्येक डोस २८ दिवसांच्या अंतराने घ्यायचा आहे.