देशाच्या अर्थव्यवस्थेला Economy सावरण्यासाठी आगामी काळात किरकोळ (रिटेल) स्तरावर झालेल्या शेतमालासह अत्यावश्यक वस्तूंच्या खरेदीतील वाढ कारणीभूत ठरेल, असा विश्वास रिटेलर्स असोसिएशन ऑफ इंडियाने (राय) व्यक्त केला आहे. यासंबंधी प्रसिद्ध केलेल्या अहवालात ‘राय’ने म्हटले आहे, की नागरिकांचा प्राधान्यक्रम आता अत्यावश्यक वस्तूंकडे वळला आहे.
आपल्या अहवालात ‘राय’ने नमूद केले आहे, की नागरिकांकडून केल्या जाणाऱ्या खर्चामध्ये सर्वाधिक वाटा शेतमाल आणि अत्यावश्यक वस्तूंचा आहे. रिअल इस्टेट सर्व्हिसेस संस्था असलेल्या अॅनारॉकच्या सहकार्याने केलेल्या या सर्वेक्षण अहवालात कोरोना काळात अत्यावश्यक वस्तूंच्या खरेदीचे प्रमाण दीडपट वाढल्याचे नमूद करण्यात आले आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीला महिन्याच्या खर्चामध्ये अत्यावश्यक वस्तूंवर एकावेळी होणारा खर्च ६५० रुपये होता; परंतु टाळेबंदी उठवल्यानंतरच्या काळात हाच खर्च ९०० रुपयांवर गेला.
भाजी, दुध, फळे, धान्य, किराणा, एफएमसीजी यांसारख्या वस्तूंवर सर्वाधिक खर्च सध्या होत आहे. त्यापाठोपाछ सौंदर्यप्रसाधने, वैयक्तिक निगा, आरोग्यनिगा आणि अन्य घरगुती वापराच्या वस्तूंवर खर्च केला जात आहे; मात्र या क्षेत्रांना पूर्णपणे सावरण्यासाठी आणखी चार ते सहा तिमाही लागणार आहेत. कोरोना संसर्गापूर्वीच एकाच वेळी अनेक मार्गांनी खरेदी करू देणाऱ्या रिटेल दुकानांचे महत्त्व वाढण्यास सुरुवात झाली होती, असे ‘राय’चे ‘सीईओ’ कुमार राजगोपालन यांचे म्हणणे आहे. आता कोरोनाकाळात डिजिटल ब्राउझिंग, क्लिक अॅण्ड कलेक्ट, कर्बसाइड डिलिव्हरी व व्हिडिओ शॉपिंग या सर्व सुविधा देणाऱ्या रिटेलर्सना अधिक पसंती मिळत असल्याकडे राजगोपालन यांनी लक्ष वेधले.