Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

भारतीय कापसाला प्रथमच मिळाला ब्रँड आणि लोगो

भारतीय कापसासाठी ऐतिहासिक दिवस

केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री श्रीमती स्मृती इराणी यांनी भारतीय कापसासाठी प्रथमच ब्रँड आणि लोगोचा आज दुसऱ्या जागतिक कापूस दिनी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून शुभारंभ केला. जागतिक कापूस बाजारात आता भारताचे प्रमुख सूत ‘कस्तुरी सूत’ म्हणून ओळखले जाईल. कस्तुरी कापूस शुभ्रपणा, चमक, मुलायमपणा, शुद्धता, चमक वेगळेपणा आणि भारतीयतेसाठी ओळखला जाईल.

याप्रसंगी बोलताना स्मृती इराणी म्हणाल्या, भारतीय कापसासाठी हा बहुप्रतीक्षीत क्षण आहे. आज भारतीय कापसाला ब्रँड आणि लोगो मिळाला. जगभर दुसरा कापूस दिन साजरा होत असताना ही महत्त्वाची घटना आहे.

मंत्र्यांनी कापसाचे भारतीय अर्थव्यवस्थेतील महत्त्व विशद केले. त्या म्हणाल्या, कापूस हे प्रमुख व्यापारी पीक आहे, जे 6.00 दशलक्ष शेतकऱ्यांना उपजिविका प्राप्त करुन देते. भारत कापूस उत्पादनात जगात दुसऱ्या क्रमाकांवर आहे आणि जगातील सर्वात मोठा कापसाचा ग्राहक आहे. जागतिक कापसापैकी 23% कापसाचे उत्पादन भारतात होते. तर, जगाच्या सेंद्रीय कापसापैकी 51% उत्पादन भारतात होते. यातून भारताचे शाश्वततेविषयीचे प्रयत्न दिसून येतात.

वस्त्रोदयोग मंत्रालयाने अपेडाच्या (APEDA) माध्यमातून सेंद्रीय कापसासाठी प्रमाणपत्र प्रक्रिया विहित केली आहे जी संपूर्ण वस्त्र पुरवठा साखळीत टप्प्याटप्प्याने सुरू केली जाईल.

कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (CCI) शेतकऱ्यांना कापसासाठी आतापर्यंतची सर्वाधिक किमान आधारभूत किंमत दिली आहे. सीसीआयने 430 कापूस खरेदी केंद्र उघडली आहेत आणि शेतकऱ्यांना डिजीटल पद्धतीने 72 तासांत पैसे दिले जातात. तसेच ‘कॉट- अॅली’ या मोबाईल अॅपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना हवामान, पीक परिस्थिती आणि उत्तम शेतीविषयीची माहिती दिली जाते. एमएसएमई सूतगिरण्या, खादी आणि ग्रामोद्योग, सहकारी सूतगिरण्या यासाठी प्रति कँडी 300 रुपये सूट दिली जाते. सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी कृषी विधेयके मंजूर केल्याचे मंत्री म्हणाल्या.

Exit mobile version