सी-डॅकच्या सहकार्याने देशात सुपरकम्प्युटिंगशी संबंधित सुट्या भागांची निर्मिती सुरु होणे हे “आत्मनिर्भर भारता” च्या दिशेने टाकलेले पुढचे पाऊल आहे” : केंद्रीय मंत्री संजय धोत्रे
केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहित तंत्रज्ञान,शिक्षण आणि दूरसंचार राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्या उपस्थितीत आज सी-डॅक संस्था आणि आयआयटी अर्थात भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या विविध शाखा यांच्यादरम्यान भारतात संगणक प्रणालीच्या महत्त्वाच्या सुट्या भागांची निर्मिती तसेच जोडणी आणि सुपरकम्प्युटिंगसाठीच्या पायाभूत सुविधांची निर्मिती करण्याबाबतच्या सहकार्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
सी डॅक संस्थेचे महानिर्देशक डॉ.हेमंत दरबारी आणि राष्ट्रीय सुपरकम्प्युटिंग अभियान चालविणाऱ्या बंगळुरूच्या भारतीय विज्ञान संस्थेचे तसेच कानपूर,रुरकी, हैदराबाद, गुवाहाटी,मंडी,गांधीनगर, त्रिची, मद्रास, खरगपूर, गोवा,पलक्कड आणि मोहालीची एनएसएमची एचपीसी आणि कृत्रिम बुद्धिमत्ता प्रशिक्षण केंद्र एनएबीआय ही संस्था यांचे संचालक यांच्यात हा करार झाला.
“शिक्षणक्षेत्र, औद्योगिक क्षेत्र, विज्ञान आणि संशोधनाशी संबंधित समुदाय आणि विविध स्टार्टअप्स यांना आवश्यक असलेली संगणकीय क्षमता प्रदान करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली राष्ट्रीय सुपरकम्प्युटिंग अभियान सुरु करण्यात आले, विज्ञान आणि अभियांत्रिकी क्षेत्राशी संबंधित प्रत्यक्ष जीवनात येणाऱ्या समस्या आणि भारतातील या क्षेत्रांशी संबंधित विशिष्ट आव्हाने यांच्यावर उपाययोजना शोधण्याच्या उद्देशाने हे अभियान सुरु झाले.
सी-डॅकने यापूर्वीच पुणे, बंगळूरू, खरगपूर आणि भुवनेश्वर येथील विविध तंत्रज्ञान संस्थांमध्ये सुपरकम्प्युटिंगशी संबंधित प्रणालींच्या स्थापनेला सुरुवात केली आहे. आणि आता संगणक शास्त्रातील संशोधन आणि नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून सर्व्हर बोर्ड, इंटरकनेक्ट, रॅक पॉवर कंट्रोलर्स तसेच हायड्रॉलिक कंट्रोलर्स, डायरेक्ट लिक्विड कूल्ड डाटासेंटर, एचपीसी सॉफ्टवेयर स्टॅक यासारख्या अत्यंत महत्त्वाच्या सुपरकम्प्युटिंगशी संबंधित सुट्या भागांची देशात निर्मिती सुरु होणे हे “आत्मनिर्भर भारता” च्या दिशेने टाकलेले पुढचे पाऊल आहे”, असे संजय धोत्रे यांनी याप्रसंगी बोलताना सांगितले.