एक्सपो 2020 दुबई मधील भारतीय दालनातील चर्चासत्रात भारताच्या भरड धान्याच्या निर्यात क्षमतेचे आणि मूल्य शृंखला वाढवण्याच्या मार्गांचे दर्शन
सध्या सुरू असलेल्या ‘अन्न, शेती आणि उपजीविका’ पंधरवड्याचा एक भाग म्हणून, दुबईत एक्स्पो 2020 मधील भारतीय दालनातर्फे शुक्रवारी ‘भारत: भरड धान्य उत्पादन आणि वाढीव मूल्य साखळी’ या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. वरिष्ठ सरकारी अधिकारी आणि क्षेत्रातील तज्ज्ञांनी या सत्रादरम्यान देशाची निर्यात क्षमता वाढवण्यासाठी भरड धान्य उत्पादन आणि प्रक्रिया करणार्या भारतीय उद्योगांच्या संधींवर चर्चा केली.
या सत्रात बोलताना, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव डॉ. अभिलाक्ष लेखी म्हणाले, “आम्ही स्टार्टअप्स आणि शेतकरी उत्पादक संघटनांना (FPOs) आवाहन करतो की त्यांनी केवळ भरड धान्याची मूल्य साखळी वाढवण्यात, देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठांशी जोडण्यासाठी मदत न करता जिथे आम्ही उत्पादक समुदायांना सोबत घेऊ असा एक सर्वसमावेशक आराखडा तयार करावा.”
संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने भारताने प्रायोजित केलेला ठराव मंजूर केला आणि 70 हून अधिक राष्ट्रांनी 2023 हे ‘भरड धान्याचे आंतरराष्ट्रीय वर्ष’ म्हणून घोषित केले, ज्याचा उद्देश बदलत्या हवामान परिस्थितीत धान्याचे आरोग्य फायदे आणि त्याच्या लागवडीच्या योग्यतेबद्दल जागरूकता वाढवणे हा आहे. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या सहसचिव (पीक आणि तेलबिया) शुभा ठाकूर यांनी सांगितले की, “आंतरराष्ट्रीय भरड धान्याचे वर्ष लक्षात घेऊन, आम्ही भरड धान्य मोहिमेचे पोषण फायदे आणि मूल्य साखळीवर प्रकाश टाकून त्याला गती देण्याचा प्रयत्न करत आहोत.”
भरड धान्याच्या पोषण सुरक्षेचे पैलू अधोरेखित करताना, न्यूट्रीहबचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी दयाकर राव म्हणाले, “भरड धान्याचे आरोग्यविषयक फायदे आहेत आणि ती लठ्ठपणा आणि कुपोषण कमी करू शकतात. ही जीवनसत्त्वे, खनिजे आणि फायटोकेमिकल्सने परिपूर्ण आहेत आणि ती उच्च रक्तदाब, मोठ्या आतड्याचा कर्करोग आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांवर मात करण्यास मदत करतात कारण ती शरीरात असलेली ट्रायग्लिसराइड्स कमी करतात.
अनेक स्टार्टअप्स आणि शेतकरी उत्पादक संघटना ‘अन्न, कृषी आणि उपजीविका’ पंधरवड्यात सहभागी होत आहेत आणि त्यांचे नाविन्यपूर्ण कृषी तंत्रज्ञान उपाय आणि शाश्वत आणि पौष्टिक भरड धान्य -आधारित उत्पादने प्रदर्शित करत आहेत.
‘अन्न, शेती आणि उपजीविका’ पंधरवड्याचा 2 मार्च रोजी समारोप होणार आहे.