Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील दुग्धजन्‍य पदार्थास वाढती मागणी

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील पशुसवंर्धन व दुग्धशास्‍त्र विभागातील नवी दिल्‍ली येथील भारतीय कृषि अनुसंधान संस्थ पुरस्कृत दुग्धतंत्रज्ञानावर आधारित अनुभवातुन शिक्षण प्रकल्पास दिनांक 3 ऑक्‍टोबर रोजी कुलगुरु मा. डॉ. अशोक ढवण यांनी भेट दिली. सदरिल प्रकल्‍पात अनुभवातुन शिक्षण कार्यक्रमाच्‍या माध्‍यमातुन कृषिच्‍या विद्यार्थांना दर्जेदार दुग्‍धजन्‍य पदार्थ निर्मिती व विपणन याबाबत आठव्‍या सत्रात प्रशिक्षणाच्‍या माध्‍यमातुन व्‍यावसायिक ज्ञान दिले जाते. या प्रकल्‍पात वर्षभर नियमितपणे बर्फी, खवा, पनीर, बासुंदी, आईसक्रीम आदी दर्जेदार दुग्धजन्‍य पदार्थांची निर्मिती करण्‍यात येऊन विक्री करण्‍यात येते. सणासुदीस काळात या दुग्धजन्‍य पदार्थास मोठया प्रमाणात मागणी वाढत आहे.

भेटी दरम्‍यान मार्गदर्शन करतांना कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांनी म्‍हणाले की, आरोग्याच्‍या दृष्‍टीने दुग्धजन्‍य पदार्थास विशेष महत्‍व आहे, परंतु काही वेळेस बाजारात या पदार्थात भेसळ होते. सदरिल प्रकल्‍पात निर्मिती करण्‍यात येणा-या दर्जेदार दु्ग्धजन्‍य पदार्थास शहरातील नागरिकांची मागणी वाढत आहे, प्रकल्‍पात स्‍वच्‍छता व पॅकेजिंग कडे विशेष लक्ष देण्‍यात येत आहे, ही चांगली बाब आहे. असे सांगुन प्रकल्‍पातील निर्मिती करण्‍यात येत असलेल्‍या पदार्थाच्‍या गुणवत्तेची प्रशंसा केली. गेल्‍या दोन ते तीन वर्षात विद्यापीठास बीजोत्‍पादन, रोपवाटीका, जैविक खते आदीपासुन प्राप्‍त होणा-या महसुलात निश्चितच वाढ करण्‍यात आपणास यश मिळाले आहे, तसेच सदरिल पदार्थ विक्री वाढीसाठी प्रयत्‍न करण्‍याचा सल्‍ला त्‍यांनी दिला.

प्रकल्‍पाबाबत माहिती देतांना विभाग प्रमुख तथा प्रकल्पाचे प्रभारी डॉ. जी. के. लोंढे म्‍हणाले की, प्रकल्‍पातील दुग्धजन्य पदार्थाच्या विक्रीसाठी विद्यापीठाच्या प्रवेशव्दाराजवळ सुविधा निर्माण केल्‍यास दुग्धजन्‍य पदार्थ विक्रीत वाढ होईल. तसेच विभागात कुक्‍कटपालन व शेळीपालन यांचे व्‍यावसायिक ज्ञान विद्यार्थी व शेतकरी बांधवांना नियमित दिले जात, असल्‍याचे सांगितले.  या प्रसंगी  माननीय कुलगुरु यांनी पनीर, खवा, बासुंदी आदीं पदार्थाची स्‍वत: खरेदी केली. यावेळी शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले, कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सय्यद ईस्माईल, डॉ. एस. डी. बंटेवाड, डॉ. के. टी. अपेट, डॉ. एम. जी. जाधव, डॉ.  एस. एस. मोरे आदीसह विभागातील प्राध्यापक उपस्थित होते.

Exit mobile version