रेल्वेमध्ये होणारी गर्दी रोखण्यासाठी तसेच कोविडचा प्रसार थांबविण्याकरिता रेल्वेचा कृतीशील उपाय म्हणून प्रवास भाड्यात वाढ
प्रवासी गाड्यांमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून कमी अंतरासाठी जादा भाडे आकारले जात आहे या संदर्भातील बातम्या अलीकडे प्रसार माध्यमांमध्ये प्रसारित होत आहेत. अनावश्यक प्रवासाला आळा घालण्यासाठी प्रवासी आणि इतर कमी अंतराच्या गाड्यांचे भाडे काहीसे जास्त ठेवण्यात आले आहे अशी माहिती रेल्वेने दिली. हे भाडे समान अंतरासाठी मेल / एक्सप्रेस गाड्यांच्या अनारक्षित तिकिटांच्या किंमतीवर निश्चित केले आहे.
कोविड अजूनही आहे आणि काही राज्यांमध्ये परिस्थिती अजूनही गंभीर आहे. बर्याच राज्यांतून आलेल्या प्रवाशांची इतर राज्यात चाचणी करून त्यांना प्रवास करण्यापासून परावृत्त केले जात आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी 22 मार्च 2020 रोजी पुकारलेल्या कोविडशी संबंधित देशव्यापी लॉकडाऊनमुळे भारतीय रेल्वेला नियमित गाड्यांचे परिचालन बंद करावे लागले होते.
भारतीय रेल्वे टप्प्याटप्प्याने प्रवासी गाड्यांची संख्या सातत्याने वाढवत आहे. कोविड नंतरच्या कालवधीत प्रवासी गाड्यांची नियमित सेवा पूर्ण क्षमतेने सुरु करण्यासाठी अनेक बाबी आणि परिचालन परिस्थिती लक्षात घेऊन यासंदर्भात विचार केला जाईल.
एकूण 1250 मेल / एक्सप्रेस, 5350 उपनगरी सेवा आणि 6२6 हून अधिक प्रवासी गाड्या सध्या दररोज कार्यरत आहेत.
सध्या धावणाऱ्या कमी अंतराच्या प्रवासी गाड्या ह्या एकूण गाड्यांच्या 3 टक्यांपेक्षा कमी आहेत. राज्य सरकारांसोबत विचारविनिमय करून अशा आणखी गाड्या सुरु करण्याचा विचार आहे.
रेल्वे सेवा पूर्वीप्रमाणे सामान्य पद्धतीने सुरु करण्यासाठी राज्यांमधील आरोग्यविषयक परिस्थिती आणि राज्य सरकारांचे याबाबतचे मत विचारात घेणे आवश्यक आहे.
प्रवाशांना नेहमीच रेल्वेकडून अनुदान दिले जाते ही बाब लक्षात घेतली पाहिजे.
रेल्वे स्थानकांवर आणि गाड्यांमध्ये होणारी गर्दी नियंत्रित करण्याच्या दृष्टीने प्रवासी गाड्यांसाठी कोविडपूर्व कालावधीपेक्षा किंचित जास्त भाडे आकारले जात आहे. कोविड काळात आवश्यक असलेल्या मार्गदर्शक नियमावलीच्या अनुषंगाने सेवा पूर्ववत करण्यासाठी परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे.