भौगोलिक मानांकन प्राप्त कृषी उत्पादनांच्या निर्यातीला केंद्र देतेय प्रोत्साहन

भारताच्या भौगोलिक मानांकन प्राप्त उत्पादनांना ब्रिटन, दक्षिण कोरिया आणि बहारीन या देशांमध्ये लाभत आहे नवी बाजारपेठ

स्थानिक दृष्ट्या भौगोलिक मानांकन (जीआय) प्राप्त कृषी उत्पादनांच्या निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी नवी उत्पादने आणि नव्या निर्यात बाजारपेठा शोधण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे.

दार्जीलिंग चहा आणि बासमती तांदूळ या भारताच्या दोन लोकप्रिय भौगोलिक मानांकन प्राप्त कृषी उत्पादनांना जगभरातल्या बाजारपेठेत स्थान प्राप्त केले आहे. देशाच्या विविध भागात अशी भौगोलिक मानांकन प्राप्त उत्पादने आहेत ज्यांचा स्वतःचा ग्राहकवर्ग आहे आणि अधिक संभाव्य ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांच्या योग्य विपणनाची आवश्यकता आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘व्होकल फॉर लोकल’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ संकल्पनेला अनुसरत, अपेडा अर्थात  कृषी आणि प्रक्रिया खाद्य उत्पादन निर्यात विकास प्राधिकरणाने, आपल्या देशातल्या उत्पादनांना जगातल्या  नव्या बाजारपेठांमध्ये पाठवण्यासाठी सुविधा देत आहे. या उत्पादनांमध्ये काला नमक तांदूळ, नागा मिर्च, आसाम काजी नेमू, बंगलोर रोझ ओनियन, नागपूर संत्री, जीआय प्राप्त आंबे, जीआय प्राप्त शाही लीची, भालीया गहू, मदुराई मल्ली, बर्धमान मिहीदाना आणि सीताभोग, डहाणू घोलवड  चिकू, जळगाव केळी, वाझाकुलम अननस, मरयुर गुळ यांचा या उत्पादनात समावेश आहे.

वाराणसी इथे विशेषकरून भौगोलिक मानांकन कृषी उत्पादनांसाठी निर्यात केंद्र निर्माण करण्याच्या दृष्टीने, शेतकरी उत्पादक संघटना, खाद्यान्न उत्पादक कंपन्या आणि निर्यातदार यांना आंतरराष्ट्रीय व्यापार समुदायाशी जोडण्यावर सरकार मोठा भर देत आहे.

भौगोलिक मानांकन प्राप्त उत्पादनांना प्रोत्साहन सुनिश्चित करण्यासाठी वाराणसी इथले लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळ हे महत्वाचे ठिकाण निश्चित करण्यात आले आहे. 2021 च्या जूनमध्ये हंगामातली  पहिली खेप 1048 किलो भौगोलिक मानांकन प्राप्त मलीहाबादी दशहेरी आंबा लखनऊ इथून ब्रिटन आणि संयुक्त अरब अमिरातीला पाठवण्यात आला.

इतर प्रांतातल्या भौगोलिक मानांकन प्राप्त उत्पादनामध्ये महाराष्ट्रातल्या सांगलीच्या बेदाणा, नागपूरची संत्री, डहाणू घोलवड चिकू, मराठवाडा केशर आंबा, जळगाव केळी यांचा समावेश आहे.

2020 मध्ये अपेडाच्या उत्पादनाची ही मोठी निर्यात बाजारपेठ असलेल्या, संयुक्त अरब अमिरात आणि अमेरिकेत आभासी ग्राहक- विक्रेता मेळा आयोजित करण्यात आला होता. अबुधाबी आणि वॉशिंग्टन डीसी इथल्या भारतीय दूतावासाच्या सहकार्याने याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळ्याने भारतीय निर्यातदार आणि अमेरिका आणि संयुक्त अरब अमिरात आयातदार यांच्यातल्या संवादासाठी व्यासपीठ पुरवले आहे.

एप्रिल 2020 ते मार्च 2021 या काळात संयुक्त अरब अमिरात, इंडोनेशिया, कुवेत, इराण, थायलंड, भूतान, स्वित्झर्लंड, जर्मनी, सौदी अरेबिया, उझबेकिस्तान, या  देशांमध्ये अपेडा सूची उत्पादनासाठी असे मेळे आयोजित करण्यात आले. भौगोलिक मानांकन प्राप्त उत्पादनांच्या निर्यातीवर विशेष लक्ष पुरवण्यात आले.

आतापर्यंत 417 नोंदणीकृत भौगोलिक मानांकन प्राप्त उत्पादने (ताजी फळे, भाज्या, प्रक्रिया केलेली उत्पादने) आहेत.