ज्‍वार संशोधन केंद्रात ट्रायकोडर्मा जैविक बुरशीनाशक उत्‍पादन विभागाचे उदघाटन

विद्यापीठ निर्मित जैविक उत्‍पादने जास्‍तीत जास्‍त शेतकरी बांधवापर्यंत पोहचविण्‍याचा प्रयत्‍न ….. कुलगुरू  डॉ अशोक ढवण

जमिनीत अनेक प्रकारच्‍या बुरशी असतात, त्‍यातील काही बुरशी पिकांसाठी रोगकारक असतात तर काही बुरशी पिकांचे रोगांपासुन संरक्षण करतात. ट्रायकोडर्मा ही बुरशी ही एक उपयुक्‍त बुरशी असुन ही रोगजनक बुरशीचा प्रतिबंध करून पिकांचे रोगापासुन बचाव करते. विद्यापीठ निर्मित ट्रायकोडर्मा जैविक बुरशीनाशक जास्‍तीत जास्‍त शेतकरी बांधवापर्यंत पोहचविण्‍याकरिता परभणी येथील ज्‍वार संशोधन केंद्रात याची निर्मिती करण्‍यात येणार असुन येणा-या खरिप हंगामात शेतक-यांना यांचा लाभ होणार असल्‍याचे प्रतिपादन कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील ज्‍वार संशोधन केंद्रात ट्रायकोडर्मा जैविक बुरशीनाशक उत्‍पादन विभागाचे उदघाटन कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले, त्‍याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर यांची प्रमुख उपस्थिती होती तर संशोधन केंद्राचे डॉ एल एन जावळे, डॉ विक्रम घोळवे, विभाग प्रमुख डॉ कल्‍याण आपेट, डॉ एस पी मेहत्रे, डॉ एस एम उमाटे, डॉ एस बी घुगे, डॉ महमद इलियास, डॉ जी एम कोटे आदींची उपस्थिती होती.

कुलगुरू मा डॉ अशोक ढवण पुढे म्‍हणाले की, विद्यापीठ शास्‍त्रज्ञांनी शेतकरी बांधवासाठी समर्पित भावनेने कार्य करावे. शेतकरी बांधवाची विद्यापीठ निर्मित कमी खर्चिक विविध निविष्‍ठांची मागणी पाहता मराठवाडयातील प्रत्‍येक जिल्‍हयात या निविष्‍ठा उपलब्‍ध करण्‍याचा विद्यापीठाचा मानसही त्‍यांनी व्‍यक्‍त केला.

संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर म्‍हणाले की, विद्यापीठात मनुष्‍यबळाची कमतरता आहे, असे असतांनाही विद्यापीठ निविष्‍ठा निर्मितीत वाढ करण्‍याचा विद्यापीठाचा प्रयत्‍न आहे.  विद्यापीठ शास्‍त्रज्ञांनी प्रामाणिकपणे शेतक-यांची सेवा करावी, यातच खरे समाधान असल्‍याचे ते म्‍हणाले.

ज्‍वार रोगशास्‍त्रज्ञ डॉ विक्रम घोळवे यांनी ट्रायकोडर्मा उत्‍पादन विभागाबाबत माहिती देतांना सांगितले, द्रवरूप व पावडर स्‍वरूपात ट्रायकोडर्मा उपलब्‍ध होणार असुन ट्रायकोडर्मा हर्झियानम व ट्रायकोडर्मा अस्‍पेरेलम विरिडी यांचे मिश्रण ट्रायकोबुस्‍ट या नावाने विक्री करण्‍यात येणार आहे.

मान्‍यवरांच्‍या हस्‍ते  ट्रायकोडर्मा शेतक-यांसाठी एक वरदान या घडीपत्रिकेचे विमोचन करण्‍यात आले. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक डॉ एल एन जावळे यांनी केले तर सुत्रसंचालन श्रीमती प्रितम भुतडा यांनी केले. कार्यक्रमास डॉ चंद्रशेखर अबांडकर, डॉ मिनाक्षी पाटील आदीसह संशोधन केंद्रातील शास्‍त्रज्ञ व कर्मचारी उपस्थित होते.