राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढलेली असली तरी रुग्णालयात दाखल होण्याचा दर केवळ ५.७ टक्के इतकाच आहे. राज्यात २० ते २६ जानेवारी या काळात आठवड्याचा पॉझिटिव्हिटी दर हा तब्बल २३.८२ टक्के इतका नोंदवला गेला आहे.
राज्याच्या या पॉझिटिव्हिटी दरापेक्षा पुण्यासह २२ जिल्ह्यांमध्ये हा दर जास्त आहे. मात्र, रुग्णालयात भरती होण्याचा दर कमी आहे, अशी माहिती राज्य मंत्रिमंडळासमोर ठेवण्यात आलेल्या अहवालात नमूद करण्यात आली आहे. हा अहवाल राज्याच्या आरोग्य विभागाने तयार केला आहे. पॉझिटिव्हिटी दर जास्त असणा-या जिल्ह्यांमध्ये नागपूरमध्ये हा दर ४४.५९ टक्के इतका आहे, तर पुण्यात ४२.४९ टक्के त्यानंतर नाशिकमध्ये ४०.९४, गडचिरोलीमध्ये ३९.१८ आणि वर्ध्यात ३८.११ टक्के इतका आहे.
याबाबत राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रदीप व्यास म्हणाले की राज्यातील ९४.३ टक्के सक्रिय रुग्ण हे घरातच उपचार घेत आहेत. तर १.९२ टक्के रुग्ण हे रुग्णालयांमध्ये अत्यवस्थ आहेत. एकूण सक्रिय रुग्णांपैकी ०.८४ टक्के रुग्ण हे आयसीयुमध्ये तर ०.३ टक्के रुग्ण व्हेंटिलेटरवर तर०.५४ टक्के रुग्ण हे ऑक्सिजनवर आहेत.
या अहवालानुसार या आठवड्यातील एकूण २,७९,६२१ नवीन कोरोनाबाधितांपैकी पुणे, नागपूर, मुंबई, ठाणे आणि नाशिकमध्ये १,७६,५८७ नवीन कोरोनाबाधित आढळले. उर्वरित रुग्ण इतर जिल्ह्यामध्ये आढळले आहेत. अनेक जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्येने सर्वोच्च पातळी गाठली असून तेथील संख्या कमी होत आहे. मात्र, तज्ज्ञांनी सांगितल्याप्रमाणे आता संसर्ग हा ग्रामीण भागात आढळत आहे.
मुंबईतील पॉझिटिव्हिटी दर हा ३.२ टक्के इतका झाला असल्याचे महापालिकेच्या अधिका-यांनी सांगितले. नव्या रुग्णांमधील घट ही हळूहळू कमी होत असल्याचेही या वेळी सांगण्यात आले.