निफाड (प्रतिनिधी) : निफाड तालुक्यातील ज्या शेतजमीन धारकांनी थकित शेतसारा, अनधिकृत बिनशेती दंड यांचा वेळोवेळी नोटीसा बजावूनही भरणा केलेला नाही अशा थकबाकीदार खातेदारांच्या सातबारा उताऱ्यावर महाराष्ट्र शासन असे नांव लावण्याची कार्यवाही करावी असे आदेश तहसिलदार शरद घोरपडे यांनी तालुक्यातील तलाठी कार्यालयाना दिले आहेत.
आदेशात म्हटले आहे की, अनेक शेती खातेदारांकडे व बिगरशेती खातेदारांकडे शासनाचे शेतसारा, बिनशेती सारा तसेच अनधिकृत बिनशेती दंड थकले आहेत. त्यांना वेळोवेळी कर भरण्या बाबत नोटीसा व नमुना ४, सक्तीच्या नोटीसाही पाठवण्यात आल्या आहेत. मात्र अनेक खातेदार कर भरण्यास कसूर करत आहेत. अशा सर्व कसूर करणाऱ्या खातेदारांचे नांव कमी करून सात बारा उताऱ्यावर ” महाराष्ट्र शासन ” असे नांव दाखल करण्याची कार्यवाही करण्यात यावी. त्यामुळे थकबाकीत असणाऱ्या खातेदारांनी असणारी बाकी भरणा न केल्यास सातबारावर शासनाचे नाव लागणार आहे. या मुळे महसुल विभागाचा कर न भरणाऱ्या शेतकऱ्यांचे धाबे दणाणले आहे.