हरभरा पिकाचे पाणी व्यवस्थापनातील महत्वाच्या बाबी

हरभर्‍याचे अधिक उत्पादन मिळविण्यासाठी या पिकाचे पाणी व्यवस्थापन अतिशय काटेकोरपणे करणे गरजेचे आहे. चुकीचे पाणी व्यवस्थापन झाल्यास उत्पादन वाढीऐवजी उत्पादनात घट येऊन आर्थिक फटका बसण्याची शक्यता असते. त्यामुळे पाणी व्यवस्थापन करीत असताना जमिनीचा मगदूर लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. हलक्या जमिनीत पाण्याच्या ३ ते ४ पाळ्या तर मध्यम ते भारी जमिनीत पाण्याच्या २ ते ३ पाळ्या योग्य वेळी आवश्यक असतात.

हरभरा पीक हे मुळातच कमी पाण्यावर येणारे रब्बी हंगामातील महत्त्वाचे कडधान्य पीक आहे. हरभरा पिकाची पाण्याची गरज ही कमी असून, नुसते ओलाव्यावर हे पीक चांगल्या प्रकारे उत्पादन देते.

कोरडवाहू परिस्थिती
कोरडवाहू परिस्थितीत पेरलेल्या हरभरा पिकाला, जमिनीत उपलब्ध ओलाव्याचे प्रमाण कमी असेल आणि दोन पाण्याच्या पाळ्या देणे शक्य असेल तर पहिले पाणी पीक फुलोर्‍यात असताना म्हणजेच पीक उगवणीनंतर ४५ दिवसांनी, तर दुसरे पाणी घाटे भरते वेळी म्हणजेच उगवणीनंतर ७५ दिवसांनी देणे फायद्याचे ठरते. पाणी मर्यादित असल्यास एकच पाणी देणे शक्य होत असल्यास कमीत कमी एक पाणी घाटे भरत असताना द्यावे. हरभरा पिकास एक पाणी दिल्यास उत्पादनात ३० टक्क्यांपर्यंत तर दोन पाणी दिल्यास ५२ टक्क्यांपर्यंत वाढ होते. त्यामुळे कोरडवाहू परिस्थितीत पाण्याची सोय असल्यास आवश्यक पाणी द्यावे.

बागायती परिस्थिती
बागायती हरभर्‍याला पाणी व्यवस्थापन करत असताना पाणी देण्यासाठी कोणत्या पद्धतीचा उपयोग करायचा, ते आधी ठरवावे. कारण ज्या पद्धतीचा वापर करणार, त्यानुसार लागवड पद्धतीचा अवलंब करणे सोयीचे होईल.

मोकाट पद्धतीने अथवा सर्‍यामधून पाणी देणे
हरभरा पिकाला सार्‍याद्वारे (सरी) पाणी द्यावयाचे असल्यास लागवडसुद्धा सार्‍या पाडून केलेली असावी लागते. या पद्धतीमध्ये पहिले पाणी पेरणीआधी द्यावे. वाफसा आल्यानंतर पेरणी करावी. त्यानंतर दुसरे पाणी पीक उगवणीनंतर ४० ते ४५ दिवसांनी, तर तिसरे पाणी पीक घाटे भरण्याच्या अवस्थेत म्हणजेच ७० ते ७५ दिवसांनी द्यावे. या पद्धतीत पाण्याचा कार्यक्षम वापर होत नाही व जास्त पाणी लागते.

दोन ओळी रुंद वरंबा सरी पद्धत
या पद्धतीत डवर्‍याच्या सहाय्याने किंवा सरी यंत्राच्या सहाय्याने ४५ सें. मी. वर सर्‍या पाडलेल्या असतात. सरीच्या दोन्ही बाजूंनी बगलेमध्ये लागवड केलेली असते. सरीमधून पाण्याच्या पाळ्या दिल्यास मोकाट पद्धतीपेक्षा या पद्धतीत २० टक्के पाण्यात बचत होऊन १५ टक्क्यांपर्यंत उत्पादनात वाढ होते. पाण्याची पहिली पाळी पेरणीनंतर लगेच, दुसरी पाण्याची पाळी उगवणीनंतर ४० ते ४५ दिवसांनी तर तिसरी पाळी ७० ते ७५ दिवसांनी द्यावी.

तुषार (स्प्रिंकलर) पद्धत
तुषार सिंचन पद्धतीने ओलित करावयाचे असल्यास प्रचलित पद्धतीने हरभरा पिकाची लागवड केलेली असावी अथवा रुंद वरंबा सरी पद्धतीने केलेली असावी. या पद्धतीत ३० ते ४० टक्क्यांपर्यंत पाण्याची बचत तर उत्पादनात २० टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकते. पाण्याची पहिली पाळी पेरणीपूर्वी द्यावी. वाफसा आल्यानंतर पेरणी करावी. पाण्याची दुसरी पाळी उगवणीनंतर ४० ते ४५ दिवसांनी तर तिसरी पाळी ७० ते ७५ दिवसांनी द्यावी. तुषार सिंचन पद्धतीबाबत बर्‍याच शेतकर्‍यांचा गैरसमज असतो की, हरभरा पिकाला तुषार सिंचन पद्धतीने पाणी दिल्यास उत्पादनात घट येते. कारण तुषार सिंचनामुळे हरभरा पिकाचा खार नष्ट होतो; परंतु खाराचा व उत्पादनाचा कोणताही संबंध नाही. त्यामुळे शेतकर्‍यांनी बिनधास्त या पद्धतीचा वापर करावा.

ठिबक (ड्रीप) सिंचन
केवळ हरभरा पिकासाठीच ठिबक संच खरेदी करणे परवडणार नाही, हे जरी खरे असले तरी ज्या ठिकाणी खरीप हंगामात दुसर्‍या कुठल्याही नगदी पिकासाठी संच वापरलेला असेल आणि रब्बी हंगामात हरभरा पिकाच्या लागवड पद्धतीत बदल करून ठिबक संचाचा व पाण्याचा कार्यक्षम वापर करणे सहज शक्य आहे. ठिबक संचाच्या नळ्यांच्या दोन्ही बाजूंना ओलाव्यापर्यंत टोकण पद्धतीने लागवड करावी. पहिले पाणी पेरणीपूर्वी तर दुसरे पाणी पीक उगवणीनंतर ४५ ते ५० दिवसांनी म्हणजे पीक फुलोर्‍यात असताना द्यावे व तिसरे पाणी पीक घाटे भरण्याच्या अवस्थेत असताना ७० ते ७५ दिवसांनी द्यावे. ठिबक संच जास्त वेळ चालवू नये. अशा पद्धतीने हरभरा पिकाचे पाणी व्यवस्थापन केल्यास निश्‍चितच कमी पाण्यात जास्तीत जास्त उत्पादन घेऊ शकतो.

कृषी विज्ञान केंद्र, जळगाव (जामोद), जि. बुलडाणा