Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

गाईंच्या कृत्रीम गर्भधारणेसाठी आयव्हीईपी प्रयोगशाळा स्थापन

दूध उत्पादकता वाढविण्यासाठी प्रयोगशाळेचा लाभ – पशु संवर्धन, दुग्ध विकास मंत्री सुनील केदार

नागपूर, दि  : राज्यातील शेतकऱ्यांकडे असलेल्या दूध उत्पादक गायींचे उत्पादन वाढविण्यासाठी भ्रूण जैवतंत्रज्ञान प्रयोगशाळेचा लाभ होईल, असा आशावाद पशु संवर्धन, दुग्ध विकास मंत्री सुनील केदार यांनी व्यक्त केला.

राष्ट्रीय गोकुळ मिशनच्या सहकार्याने नागपुरातील तेलंगखेडी येथील भ्रूण जैवतंत्रज्ञान प्रयोगशाळेचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी होते.  जिल्हा परिषद कृषी व पशु संवर्धन सभापती तापेश्वर वैद्य, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. आशिष पातूरकर, डॉ. ए. पी. सोमकुंवर, डॉ. एन. व्ही. कुरकुरे, डॉ. बी. राऊत, सुधीर दिवे, डी. एस. रघुवंशी, एम. एस. मावसकर, डॉ. सुधीर दुदलवार, सुधीर दिवे उपस्थित होते.

राज्य शासन दूध उत्पादन व इतर जोडधंद्यामधून शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यासाठी बकरीपालनातून उच्च प्रतीचे दूध, दुग्धजन्य पदार्थ, मांस यांचे उत्पादनात वाढ करणार आहे. शेतकऱ्यांच्या मदतीला पशुवैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांसह पशुसंवर्धन विभागाची व्हॅन दिली आहे. त्यासाठी पशुवैद्यकीय व्हॅन 1962 नंबर आहे. शेतकऱ्यांपर्यंत ही व्हँन 15 मिनिटात पोहोचेल, असेही त्यांनी सांगितले.

या जैव तंत्रज्ञान प्रयोगशाळेतून निर्माण होणारे बैलाचे भ्रूण हे अधिक शक्तीशाली आणि गायींची दूध देण्याची क्षमता जास्त विकसित करण्यात भर देण्यात येत आाहे. या प्रयोगशाळेमध्ये उत्पादित भ्रूण राज्यातील सर्व पशुसंवर्धन करणाऱ्या शेतकऱ्यांकडे पोहोचल्यास येथील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल. त्यासाठी राज्यातील पशुवैद्यकांना मोठ्या प्रमाणावर प्रशिक्षण देण्यात येईल, असेही सुनील केदार यांनी सांगितले.

जास्त दूध उत्पादन देणाऱ्या गायींसाठी ब्राझिलमधून भ्रूण आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे. त्यासोबतच बकरी उत्पादनावर भर देण्यात येईल. ग्रामीण भागात शेतमजुरांना मोठा आधार मिळणार असून, या बकरींचा विमा काढणार असून, शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी मदत होईल. बकऱ्यांच्या मांसाला चांगली मागणी  असून, बकरीच्या दुधापासून मिळणारे चीज हे  6-7  हजार रुपये किलो असल्याचे त्यांनी सांगितले.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी तीन कोटी रुपयांचा निधी खर्चून उभारण्यात आलेल्या प्रयोगशाळेचा जास्तीत जास्त   उपयोग या भागातील शेतकऱ्यांना व्हावा, त्याचे जीवनमान उंचावले जावे, त्यांचा आर्थिक स्तर उंचावला जावा, असे सांगून केंद्र शासन व राज्य शासनाच्या समन्वयाने हे भ्रूण जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्या गायींपर्यंत पोहोचविण्यासाठी पशुवैद्यकांना प्रशिक्षण देण्याचे सांगितले.

केवळ प्रयोगशाळेपुरते हे भ्रूण मर्यादित न राहता, शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन करत राज्यातील शेतकऱ्यांकडे असलेल्या गायींच्या दूध उत्पादनाची क्षमता वाढीस लागावी. केवळ पाच हजार रुपये खर्च येत असेल तर शेतकऱ्यांपर्यंत या भ्रूणची माहिती पोहोचवण्याचे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. तसेच अशा प्रकारच्या प्रयोगशाळा वाढविण्यासाठी केंद्र शासनाकडे राज्य शासनाने प्रस्ताव पाठविण्याचे त्यांनी आवाहन केले.

वर्षभर वेगवेगळ्या गाईंच्या गर्भधारणेसाठी मदत होणार असून, आयव्हीईपी तंत्रज्ञानाचे प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या गायींमध्ये रोपण करा. ते जिल्ह्यात यशस्वी झाल्यास येथील शेतकरी या तंत्रज्ञानाचा वापर करतील.  राज्य शासन आणि केंद्र शासनाच्या समन्वयातून राज्यातील गाईंच्या दूध उत्पादनात वृद्धी करता येईल, अशा पद्धतीची योजना बनवून देण्याचे गडकरी यांनी माफसूचे कुलगुरु डॉ. पातूरकर यांना सांगितले.

राजस्थान तसेच गुजरात येथील विविध गायींवर या भ्रूणचे रोपण करुन तयार होणाऱ्या गायींची दूध उत्पादन क्षमता वाढविता येईल, असेही ते म्हणाले.

Exit mobile version