राज्यात एच.आर.सी.टी. चाचणीचे दर निश्चित

 लाखो रुग्णांना दिलासा

राज्यात एच.आर.सी.टी. चाचणीचे दर निश्चित करण्यात आले असून १६ पर्यंत स्लाईसच्या मशीनवर चाचणीकरिता २ हजार रुपये, १६ ते ६४ स्लाईसच्या मशीनवरील चाचणीकरिता २ हजार ५०० रुपये आणि ६४ ते २५६ स्लाईसच्या मशीनवरील चाचणीसाठी ३ हजार रुपये असे दर समितीने निश्चित केले आहेत. सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी यासंदर्भात समिती गठित करण्याचे निर्देश दिले होते.

दर निश्चितीसाठी राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी  सुधाकर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ४ सदस्यांची समिती गठित केली होती.

राज्य शासनाने कोरोना  साथरोगाच्या कालावधीत एक आवश्यक बाब म्हणून विविध उपचार व चाचण्यांचे दर निश्चित केले होते. मात्र एच.आर.सी.टी. आणि एमआरआयसह इतर काही चाचण्यांचे दर निश्चित झाले नव्हते. मात्र काही खाजगी रुग्णालये आणि वैद्यकीय संस्थांकडून सदर चाचण्यांसाठी अतिरिक्त शुल्क आकारणी केली जात असल्याचे निदर्शनास येत होते. यामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत होता. याबाबतच्या तक्रारींची दखल घेत एच.आर.सी.टी. आणि एमआरआयसह विविध वैद्यकीय चाचण्या व उपचार यांची तातडीने दर निश्चिती करण्यात आली.

यासाठी राज्यमंत्री श्री. यड्रावकर यांनी पुढाकार घेऊन समिती गठित करण्याचे निर्देश दिले होते. त्यामुळे समितीने शिफारस केलेले निश्चित करण्यात आले असून अतिरिक्त शुल्क आकारणी थांबेल आणि लाखो रुग्णांना दिलासा मिळेल. विशेष म्हणजे ग्रामीण भागात केवळ १६ स्लाईसच्या मशीनवर चाचणी होत असल्याने ग्रामीण भागातील रुग्णांना अतिशय अल्प दरात ही सुविधा उपलब्ध झाली आहे. एच.आर.सी.टी समान दर निश्चितीमुळे आरोग्य क्षेत्रात एकसूत्रता येऊन जनतेला याचा थेट लाभ मिळणार आहे.