मोबाईलवरून UPI-IMPS द्वारे आता पैसे पाठविणे सर्रास रूढ होत आहे. मात्र बरेचदा आपल्या खात्यातून पैसे जातात पण समोरच्याला ते मिळत नाहीत. किंवा पैसे खात्यातून जातात, पण ट्रान्स्फर होत नाहीत. अशावेळी आपल्याला काळजी वाटणे स्वाभाविक आहे. पण असे हस्तांतरण (ट्रान्स्फर) अयशस्वी झाल्यानंतर तुमचे पैसे बँक खात्यात परत आले नाहीत तर काळजी करण्याची गरज नाही. अशा पद्धती आहेत, ज्याचा वापर करून पैसे सहज परत मिळवू शकता.
किती दिवसांत पैसे खात्यात?-
NEFT, RTGS आणि UPI द्वारे व्यवहार अयशस्वी झाल्यास किती दिवसांत पैसे तुमच्या खात्यात परत येतील हे तुम्हाला माहीत आहे का? रिझर्व्ह बँकेने 19 सप्टेंबर 2019 रोजी या संदर्भात परिपत्रक जारी केले होते. यानुसार, निर्धारित वेळेत ग्राहकाच्या खात्यात पैसे परत न केल्यास बँकेला ग्राहकाला दररोज 100 रुपये दंड भरावा लागेल.
आरबीआयचा नियम काय ?
रिझर्व बँक अर्थातच RBI च्या मते, IMPS व्यवहार अयशस्वी झाल्यास, T+1 दिवसात ग्राहकाच्या खात्यात रक्कम स्वयंचलितपणे परत केली जावी. येथे T म्हणजे व्यवहाराची तारीख. याचा अर्थ असा की आज व्यवहार अयशस्वी झाल्यास, पुढील कामकाजाच्या दिवशी रक्कम खात्यात परत जमा केली जावी. बँकेने असे न केल्यास तिला दररोज १०० रुपये दंड ग्राहकाला द्यावा लागेल.
मोबाईल युपीआय-
UPI च्या बाबत ही T+1 दिवशी ग्राहकाच्या खात्यात ऑटो रिव्हर्सलने पैसे जमा व्हायला हवे. असे न झाल्यास, T+1 दिवसानंतर बँकेला दररोज 100 रुपये दंड भरावा लागेल.
तर इथे तक्रार करा-
तुमचा व्यवहार अयशस्वी झाल्यास, तुम्ही तुमच्या सेवा प्रदात्याने प्रकरण निकाली काढण्यासाठी दिलेल्या कालमर्यादेपर्यंत प्रतीक्षा करावी. जर बँकेने विहित मुदतीत तसे केले नाही, तर तुम्हाला सिस्टम प्रदाता किंवा सिस्टम सहभागी (म्हणजे संबंधित upi कंपनी किंवा बँक) यांच्याकडे तक्रार नोंदवावी लागेल. जर ते एका महिन्याच्या आत या प्रकरणाचे निराकरण करण्यात अयशस्वी झाले, तर तुम्ही RBI च्या लोकपालाशी संपर्क साधू शकता. तुम्ही https://rbidocs.rbi.org.in/rdocs/Content/PDFs/AAOOSDT31012019.pdf द्वारे तुमच्या क्षेत्राच्या लोकपालशी संपर्क साधून तक्रार नोंदवू शकता.