नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे

औरंगाबाद, : जिल्ह्यात पावासाचा जोर कायम असून नदी काठच्या नागरिकांनी सतर्क राहावे. तसेच आवश्यक साधन सामुग्री, पशुधन सुरक्षित स्थळी स्थलातंरीत करावे, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे प्रमुख तथा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केले आहे.

जून ते सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यात सरासरी पेक्षा 150 टक्के पाऊस झाला आहे (Heavy rain in Aurangabad ) . जिल्ह्यातील लघु, मध्यम व मोठे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत. पैठण येथील नाथ सागर जलाशयात पाण्याचा वेग कायम आहे. त्यामुळे हा वेग पाहता येत्या पाच ते सहा दिवसात नाथ सागर जलाशय पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता आहे. वैजापूर, गंगापूर, पैठण आदींसह जिल्ह्यातील नदी काठच्या गावांनी सतर्क राहावे. जनावरे, धान्य सुरक्षित स्थळी ठेवावेत, असेही आवाहन जिल्हाधिकारी चव्हाण यांनी केले आहे.

याबाबत अधिक माहितीसाठी नागरिकांनी नजिकच्या उपविभागीय अधिकारी, तहसील कार्यालय अथवा जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन शाखेशी संपर्क साधावा. सातत्याने सुरु असलेल्या पावसामुळे सर्व प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु आहे. पावसाचा जोर कायम असल्याने पूर्व तयारी म्हणून प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क करण्यात येत आहे, असेही ते म्हणाले.