अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना सरकार आवश्यक ती सर्व मदत करणार

मुख्यमंत्र्यांची ग्वाही ; संकटग्रस्तांना प्रातिनिधीक स्वरूपात प्रत्येकी २५ हजारांच्या मदतीचे धनादेश

मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज सोलापूर जिल्ह्यातील पूरपरिस्थिती पाहणी दौऱ्यादरम्यान रामपूर येथे अतिवृष्टीमुळे पडझड झालेल्या घरांची आणि इतर नुकसानीची पाहणी केली. तसेच यावेळी त्यांनी नुकसानग्रस्त शेतकरी आणि ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी संकटग्रस्तांना प्रातिनिधीक स्वरूपात प्रत्येकी २५ हजारांच्या मदतीचे धनादेश ठाकरे यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले. याप्रसंगी संवाद साधताना गावक-यांना अश्रू अनावर झाले होते. त्यांना मुख्यमंत्र्यांनी धीर दिला. पूरपरिस्थिती पाहणी दौऱ्यादरम्यान अक्कलकोट तालुक्यातील बोरी नदी परिसरात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी आणि ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांना धीर दिला.

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बुधवारी (२१ ऑक्टोबर) उस्मानाबाद जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. अतिवृष्टीमुळे पडझड झालेल्या घरांच्या पाहणीसह शेती पिकांच्या नुकसानीची करणार पाहणी. तसेच प्रत्यक्ष शेतकरी-ग्रामस्थांशी मुख्यमंत्री संवाद साधणार आहेत.

अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीची पाहणी केल्यानंतर पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी पुढील प्रमाणे मुद्दे मांडले:

  1. असं नाही की आजच मला ही परिस्थिती कळलेली आहे. पावसाला सुरुवात झाल्यापासून मी इथल्या यंत्रणेच्या सातत्याने संपर्कात आहे. नुकसान किती होत आहे, पाऊस किती पडतोय ह्याचा अंदाज आणि माहिती आम्ही सगळेच जण घेत आहोत.
  2. येते काही दिवस अतिवृष्टीचा, धोक्याचा इशारा दिला गेला आहे. संकट पूर्ण टळले आहे, असे नाही. पंचनामे सुरू आहेत. पूर्ण परिस्थितीचा आढावा लवकरच घेतला जाईल आणि तो घेतल्यानंतर प्रत्यक्ष जी काही मदत करायची आहे, ते हे सरकार करणार आहे.
  3. आम्ही उद्या व परवा पण इथे येणार आहोत. शेतकरी व सर्व आपत्तीग्रस्त, ज्यांचे घरदार, संसार वाहून गेले आहेत, ते वेगळ्या संकटाच्या डोंगराखाली आहेत. त्यांना आम्ही सांगितले आहे की, आपण काळजी व चिंता करू नका, जे जे करता येणे शक्य आणि आवश्यक आहे, ते सगळे आपले सरकार केल्याशिवाय राहणार नाही.
  4. दुर्दैवाने आपले काही बांधव, माता-भगिनी मृत्युमुखी पडल्या, त्यांच्या कुटुंबीयांना दिलासा देण्याची आवश्यकता असते, तो द्यायला आम्ही सुरुवात केली आहे. कोणीही काळजी करण्याचे व घाबरण्याचे कारण नाही फक्त अजून काही दिवस धोक्याचा इशारा वेधशाळेने दिला आहे, सावध रहा, प्राणहानी होता कामा नये.
  5. पक्षपातीपणा न करता सर्व राज्यांना मदत करणं ही केंद्राची जबाबदारी आहे. केंद्राकडून मदत मागण्यात चूक काहीच नाही. उलट शुक्रवारी माननीय पंतप्रधान मोदी जी यांचा मला फोन आला होता. गरज पडल्यास लागेल ती मदत करू, असं आश्वासन त्यांनी दिलं आहे.
  6. अशावेळी पक्षीय राजकारण न करता सर्वांनी एक होऊन केंद्राकडे मदत मागावी. इथे राजकारण करू नये, मला ते करायचं नाही. शेतकऱ्यांना साह्य करणे, हा माझा प्राधान्यक्रम आहे.
  7. पाऊस विचित्र पडतोय. एका ७२ वर्षांच्या शेतकरी दादांनी सांगितले की, त्यांच्या संपूर्ण आयुष्यात त्यांनी असा पाऊस पाहिलेला नाही.