भाजप नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता पाटील लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. अंकिता पाटील यांचा विवाह स्व. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आणि बिंदुमाधव ठाकरे यांचा मुलगा निहार ठाकरे यांच्याशी येत्या 28 डिसेंबरला मुंबईत होणार आहे.
मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या नव्या निवासस्थांनी आज हर्षवर्धन पाटील आणि अंकिता पाटील यांनी त्यांची भेट घेतली. यावेळी त्यांना विवाह सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले. अंकिता पाटील यांनी राज ठाकरेंसोबतचा एक फोटोही शेअर केला आहे. अंकिता पाटील आणि निहार ठाकरे यांचा विवाह सोहळा 28 डिसेंबरला मुंबईत मोजक्या लोकांच्या उपस्थितात पार पडणार आहे.
निहार ठाकरे यांचे एलएलएमपर्यंत शिक्षण झाले आहे. त्यांनी वकिली व्यवसायात आपला जम बसवला आहे. निहार यांचे वडील बिंदुमाधव यांचे 1996 मध्ये अपघाती निधन झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि जयदेव ठाकरे हे निहार यांचे सख्खे काका आहेत. तर राज ठाकरे हे चुलत काका आहे. तर अंकिता पाटील या पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या असून त्या बावडा-लाखेवाडी जिल्हा परिषद गटाचे प्रतिनिधीत्व करतात. हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये गेले असले तरी अंकिता पाटील अद्याप काँग्रेसमध्येच आहेत.