पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणात असलेल्या भारतीय हस्तकला आणि हातमाग निर्यात महामंडळ (एचएचईसी) बंद करायला मंजुरी दिली आहे.
महामंडळात 59 स्थायी कर्मचारी आणि 6 व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी कार्यरत आहेत. सर्व स्थायी कर्मचारी व व्यवस्थापन प्रशिक्षणार्थींना सार्वजनिक उपक्रम विभागाने ठरवलेल्या निकषांनुसार ऐच्छिक सेवानिवृत्ती योजनेचा (व्हीआरएस) लाभ घेण्याची संधी दिली जाईल.
या मंजुरीमुळे सरकारचा क्रियाशील नसलेल्या आणि उत्पन्न मिळवत नसलेल्या आजारी उद्योगांमध्ये पगार / वेतनावर वारंवार होणारा खर्च कमी करण्यात मदत होईल.
आर्थिक वर्ष 2015-16 पासून महामंडळ सातत्याने तोट्यात आहे आणि खर्च भागवण्यासाठी पुरेसे उत्पन्न कमवत नाही. त्याच्या पुनरुज्जीवनाची शक्यता फार कमी असल्यामुळे कंपनी बंद करणे आवश्यक आहे.