Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

पेरूच्या निर्यातीत 260% तर दही आणि पनीर निर्यातीत 200% वाढ

भारतातून होणाऱ्या पेरूच्या निर्यातीत 2013 पासून 260% वाढ दिसून आली आहे. एप्रिल ते जानेवारी 2013-14 मध्ये 0.58 दशलक्ष अमेरिकी डॉलर्स किमतीचे पेरू निर्यात करण्यात आले तर एप्रिल ते जानेवारी 2021-22 मध्ये 2.09 दशलक्ष अमेरिकी डॉलर्स मूल्याचे पेरू निर्यात करण्यात आले.

भारतातून होणाऱ्या ताज्या फळांच्या निर्यातीत लक्षणीय प्रमाणात वाढ झाली आहे. संपूर्ण ताज्या खाद्यपदार्थांच्या श्रेणीत द्राक्षांची सर्वात जास्त निर्यात झाली आहे. वर्ष 2020-21 मध्ये, 314 दशलक्ष अमेरिकी डॉलर्स इतक्या ताज्या द्राक्षांची निर्यात करण्यात आली. 302 दशलक्ष अमेरिकी डॉलर्सची इतर ताजी फळे, 36 दशलक्ष अमेरिकी डॉलर्सचे आंबे, 19 दशलक्ष अमेरिकी डॉलर्सची सुपारीची पाने आणि फळे निर्यात करण्यात आली. भारताच्या ताज्या फळांच्या एकूण निर्यातीत ताजी द्राक्षे आणि इतर ताज्या फळांचा वाटा 92% आहे.

भारतातून 2020-21 मध्ये निर्यात करण्यात आलेली ताजी फळे मुख्यतः बांगलादेश (126.6 दशलक्ष अमेरिकी डॉलर्स), नेदरलँड्स (117.56 दशलक्ष अमेरिकी डॉलर्स), संयुक्त अरब अमिरात(100.68 दशलक्ष अमेरिकी डॉलर्स), युके (44.37 दशलक्ष अमेरिकी डॉलर्स) सौदी अरेबिया (24.79 दशलक्ष अमेरिकी डॉलर्स), ओमान (22.31 दशलक्ष अमेरिकी डॉलर्स) आणि कतार (16.58 दशलक्ष अमेरिकी डॉलर्स) या देशांना पाठविण्यात आली. 2020-21 मध्ये निर्यात करण्यात आलेल्या ताज्या फळांपैकी 82% फळे प्रमुख 10 देशांना निर्यात करण्यात आली.

दही (योगर्ट) आणि पनीर (इंडियन कॉटेज चीज) यांच्या निर्यातीत देखील 200% ची प्रचंड वाढ झाली असून एप्रिल ते जानेवारी 2013-14 मध्ये या वस्तूंची निर्यात 1 कोटी अमेरिकी डॉलर्स इतकी झाली त्यात वाढ होऊन एप्रिल ते जानेवारी 2021-22 मध्ये 3 कोटी अमेरिकी डॉलर्सची निर्यात झाली.

दुग्धजन्य वस्तूंच्या निर्यातीत गेली पाच वर्षे  10.5% चक्रवाढ दराने  वार्षिक वाढ झालेली दिसून येत आहे. वर्ष 2021-22 मध्ये (एप्रिल ते नोव्हेंबर) भारताने 181.75 दशलक्ष अमेरिकी डॉलर्स इतक्या किंमतीची दुग्धजन्य उत्पादने निर्यात केली तर विद्यमान आर्थिक वर्षात गेल्या वर्षीपेक्षा अधिक निर्यात होईल असा अंदाज आहे.

भारतातून ज्या देशांना दुग्धजन्य उत्पादनांची 2021-22 मध्ये प्रामुख्याने निर्यात झाली ते देश आहेत संयुक्त अरब अमिरात(39.34 दशलक्ष अमेरिकी डॉलर्स), बांगलादेश (24.13 दशलक्ष अमेरिकी डॉलर्स), अमेरिका (22.8 दशलक्ष अमेरिकी डॉलर्स), भूतान (22.52 दशलक्ष अमेरिकी डॉलर्स), सिंगापूर (15.27 दशलक्ष अमेरिकी डॉलर्स), सौदी अरेबिया (11.47 दशलक्ष अमेरिकी डॉलर्स), मलेशिया (8.67 दशलक्ष अमेरिकी डॉलर्स), कतार (8.49 दशलक्ष अमेरिकी डॉलर्स), ओमान (7.46 दशलक्ष अमेरिकी डॉलर्स), आणि इंडोनेशिया (1.06 दशलक्ष अमेरिकी डॉलर्स) 2020-21 मध्ये निर्यात करण्यात आलेल्या दुग्धजन्य पदार्थांपैकी  61% हून अधिक पदार्थ प्रमुख 10 देशांना निर्यात करण्यात आले.

Exit mobile version