खरीप विपणन हंगाम 2020-21 साठी हमीभावाने खरेदी प्रक्रिया

खरिपाच्या पिकांच्या 2020-21च्या विपणन हंगामाची सुरुवात झाली असून गेल्या हंगामाप्रमाणेच या हंगामातदेखील एमएसपी अर्थात किमान आधारभूत मूल्याच्या विद्यमान योजनेनुसार सरकारने खरीप 2020-21 हंगामातील पिकांची किमान आधारभूत किंमतीने खरेदी प्रक्रिया सुरु ठेवली आहे. खरिप पिकांच्या 2020-21 च्या विपणन हंगामातील तांदळाची खरेदी सुरळीतपणे सुरु असून पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, तामिळनाडू, चंदीगड, केरळ आणि जम्मू-काश्मीर या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांतील 5 लाख 33 हजार शेतकऱ्यांकडून बुधवारपर्यंत एमएसपीनुसार सुमारे 11,785.68 कोटी रुपये मूल्याच्या 62.42 लाख टनांपेक्षा अधिक तांदळाची खरेदी झाली आहे.

त्याचप्रमाणे, राज्यांनी दिलेल्या प्रस्तावानुसार खरिप पिकांच्या 2020-21 च्या विपणन हंगामात महाराष्ट्र, तामिळनाडू, कर्नाटक, तेलंगण, गुजरात, हरियाणा, उत्तर प्रदेश, ओदिशा, राजस्थान आणि आंध्र प्रदेश या राज्यांकडून 41.67 लाख टन डाळी आणि तेलबियांच्या खरेदीसाठी मंजुरी देण्यात आली आहे. तसेच, आंध्रप्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळ या राज्यांकडून 1.23 लाख टन खोबऱ्याच्या खरेदीला देखील मंजुरी मिळाली आहे. इतर राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांकडून मूल्याधार योजनेअंतर्गत डाळी, तेलबिया आणि खोबऱ्याच्या खरेदीचे प्रस्ताव आल्यानंतर त्यावर निर्णय घेतला जाईल, तसेच तिथे या पिकांच्या किंमती एमएसपीपेक्षा खाली आल्या तर राज्यांनी निर्धारित केलेल्या संस्थांच्या माध्यमातून  केंद्रीय नोडल संस्थांकडून नोंदणीकृत शेतकऱ्यांच्या पिकांची खरेदी केली जाईल.

सरकारने बुधवारपर्यंत महाराष्ट्र, तामिळनाडू आणि हरियाणा या राज्यांमधील 639 शेतकऱ्यांकडून नोडल संस्थांच्या माध्यमातून एमएसपीनुसार 4 कोटी 94 लाख रुपये किंमतीच्या 686.74 टन मुग आणि उडीद यांची खरेदी केली तसेच कर्नाटक आणि तामिळनाडू राज्यांमधील 3961 शेतकऱ्यांकडून एमएसपीनुसार 52 कोटी 40 लाख रुपये मूल्याच्या 5089 टन खोबऱ्याची खरेदी केली. खरिपाच्या डाळी आणि तेलबिया बाजारात विक्रीला आल्यानंतर त्या-त्या राज्यांनी ठरविलेल्या तारखांनुसार सरकारकडून खरेदी सुरु करण्यासाठी आवश्यक पूर्वतयारी संबधित राज्ये आणि केद्रशासित प्रदेशांकडून केली जात आहे.

कापूस खरेदी हंगाम 1 ऑक्टोबर 2020 पासून सुरु झाला असून बुधवारपर्यंत भारतीय कापूस महासंघाने 18,618 शेतकऱ्यांकडून 89,592 गासड्या कापून खरेदी केला, असून त्यांना एमएसपीनुसार 25,399 लाख 18 हजार रुपये दिले आहेत.