नांदेड जिल्ह्यात किनवट, माहूर, हिमायतनगर, भोकर या भागात असलेली वनसंपदा लक्षात घेऊन आपण भोकर येथे बांबू विकास प्रकल्प साकारुन यात आदिवासी बांधवांना रोजगार उपलब्ध करुन देण्याच्या प्रयत्नात आहोत. आपल्या जिल्ह्यात आदिवासी समाजात कोलाम व बुरुड समाजाची संख्या ही लक्षणीय आहे. हे लक्षात घेऊन येत्या काही वर्षात बांबू लागवडीतून व त्याच्या विविध व्यावसायिक उत्पादनातून जिल्ह्याची नवी ओळख निर्माण होईल, असे प्रतिपादन पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले.
नांदेड जिल्ह्यात बांबू लागवडीला चालना मिळावी या उद्देशाने डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या बांबू व रेशीम लागवड कार्यशाळेच्या उद्घाटन समारंभात त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभाग घेऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रमुख पाहुणे तथा मार्गदर्शक माजी आमदार पाशा पटेल, संजीव करपे, संदीप माळी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर-घुगे, मनपा आयुक्त सुनिल लहाने, सहाय्यक जिल्हाधिकारी कार्तीकेयन, उपजिल्हाधिकारी (रोहयो) श्रीमती अनुराधा ढालकरी, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे उपस्थित होते.
या कार्यशाळेच्या माध्यमातून बांबू लागवडी संदर्भात होणारी चर्चा व मार्गदर्शन महत्त्वाचे आहे. येथे उपस्थित असलेले कृषि, वन व महसूल मनरेगा विभागातील अधिकारी-कर्मचारी हे मार्गदर्शन जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या एकुण नद्यांची संख्या त्यांचे खोरे-काठ विचारात घेतले तर नदी-नाल्याच्या काठावर बांबू लागवडीला शेती व्यतिरिक्त मोठी संधी आहे. विशेषत: सामाजिक वनीकरणांतर्गत उपलब्ध असलेल्या जमिनीवर बांबुची लागवड करता करता येईल यादृष्टीने संबंधित विभागाने प्रयत्न करावेत, असे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले.
काळाची गजर लक्षात घेऊन बांबू लागवडीचे महत्त्व सविस्तरपणे माजी आमदार पाशा पटेल यांनी विशद केले. मनुष्याला भविष्यात जगायचे असेल तर बांबूची लागवड करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यापासून ऑक्सीजन मोठ्या प्रमाणावर मिळते आणि आज जी ऑक्सीजनची परिस्थिती निर्माण झाली आहे ती भविष्यात होणार नाही. यासाठी त्यांनी गोमाखोरे चळवळ सुरु केली आहे. बांबू लागवडीमुळे शेतकऱ्यांचे अर्थ चक्र बदलू शकते ऊसाची लागवड केल्यानंतर दोन ते तीन वर्षच उत्पन्न घेता येते. याला भरपूर खर्च येतो, परंतु बांबू लागवड एकवेळेस केली तर ते 50 ते 60 वर्ष चालते त्यामुळे खर्च कमी, पाण्याची बचत आणि शेतकऱ्यांना आर्थिक लाभही होवू शकतो, असे पाशा पटेल यांनी स्पष्ट करुन शेतकऱ्यांना बांबू लागवडीसाठी प्रवृत्त केले.
जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी जिल्ह्यात जास्तीत जास्त क्षेत्रावर बांबूची लागवड केली जाईल, असे सांगितले. सन 2021-22 मध्ये अंदाजे जवळपास 1 हजार एकरवर बांबूची लागवड केली जाईल याबाबतचे लक्षांक सर्व तालुक्यांना देण्यात येईल. तसेच भविष्यात शेतकऱ्यांसाठी सहलीचे आयोजन करण्यात येईल असेही कार्यशाळेच्या निमित्ताने त्यांनी आवर्जून सांगितले.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर-घुगे यांनी सद्या जिल्ह्यात पाऊस चांगल्या प्रकारे झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ही कार्यशाळा अतिशय योग्यवेळी घडवून आणलेली आहे. जिल्ह्यामध्ये डोंगराळ परिसर मोठ्या प्रमाणात असून त्याठिकाणी व ग्रामपंचायतीमार्फत बांबू लागवडीचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर हाती घेण्यात येईल, असे सांगितले.
बांबू लागवडी पासून फर्निचर, रिसोर्ट, खाद्य पदार्थ आदी विविध प्रकारचे साहित्य बनविता येते. त्यांचा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक लाभ होवू शकतो. सद्याच्या काळात ऑक्सीजनची जी कमतरता भासत आहे ते सुद्धा बांबू लागवडीपासून दूर होऊ शकते. वातावरणाचा समतोल राखण्यास मदत होते तसेच शेतकऱ्यांना याचा मोठ्या प्रमाणावर आर्थिक लाभ देखील होऊ शकतो या सर्व बाबीचे महत्त्व प्रत्यक्ष सादरीकरणाद्वारे संजीव करपे यांनी विशद केले.
प्रास्ताविकात शेतकऱ्यांनी बांबूची लागवड का करावी याबाबतचे महत्त्व विशद करुन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे यांनी सांगितले. प्रभारी रेशीम विकास अधिकारी डॉ. सी. बी. लटपटे यांनी रेशीम लागवड (तूती) लागवडीचे महत्त्व, लागवड संगोपन, उत्पादन, सेंद्रीय खताची मात्रा तसेच आर्थिक लाभ याबाबतचे महत्त्व सादरीकरणाद्वारे सांगितले.
सुरवातीला जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, माजी आमदार पाशा पटेल, संजीव करपे, संदीप माळी यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करुन कार्यशाळेचे उद्घाटन केले. रेशीम लागवड शेती हे पुस्तक भेट देऊन रेशीम विकास अधिकारी श्रीमती आरती वाकुरे यांनी मान्यवरांचे स्वागत केले.
प्रभारी रेशीम विकास अधिकारी डॉ. सी. बी. लटपटे, प्र. उपवनसंरक्षक एम. आर.शेख नांदेड, रेशीम विकास अधिकारी श्रीमती आरती वाकुरे तसेच जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, उपविभागीय कृषि अधिकारी, तहसीलदार, तालुका कृषि अधिकारी, गटविकास अधिकारी, वन विभागाचे व रेशीम विभागाचे सर्व अधिकारी तसेच जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.