Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

वीज खांबांपासून ३० मीटरच्या आत कृषीपंपधारकांसाठी खुशखबर

वीज खांबांपासून ३० मीटरच्या आतील कृषीपंपांना २६ जानेवारीच्या आत अधिकृत वीज जोडणी देण्याचे ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांचे स्पष्ट निर्देश

राज्यातील शेतकऱ्यांना कृषी पंपांसाठी वीज जोडण्या मिळाव्यात म्हणून वीज खांबापासून 30 मीटरच्या आत असलेल्या सर्व अनधिकृत कृषिपंप वीज जोडण्यांना येत्या 26 जानेवारीपूर्वी अधिकृतपणे जोडण्या द्याव्यात. त्यासाठी विशेष मोहीम राबवा, असे निर्देश ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले आहेत.

 

डॉ.राऊत यांनी मुंबईतील महावितरणचे मुख्यालय प्रकाशगड येथे महावितरणच्या सर्व उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. राज्य मंत्रीमंडळाने अलिकडेच मंजूर केलेल्या कृषी पंप धोरणाच्या अंमलबजावणीचा आढावा यावेळी घेण्यात आला.  बैठकीस राज्याच्या ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव आणि महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक असीम गुप्ता, मराविमं सूत्रधारी कंपनीचे सल्लागार उत्तम झाल्टे यांच्यासह सर्व संचालक, प्रादेशिक संचालक उपस्थित होते.

राज्यात जवळपास 4 लाख 85 हजार अनधिकृत कृषिपंप वीज जोडण्या असून यापैकी किमान ३० टक्के अनधिकृत जोडण्या या वीज खांबापासून ३० मीटरच्या आत आहेत. याशिवाय येत्या 31 मार्च पर्यंत राज्यातील सर्वच अनधिकृत कृषी पंप वीज जोडण्यांना अधिकृत करण्याचा महत्वपूर्ण निर्णयही उर्जामंत्री डॉ.राऊत यांनी घेतला आहे.

कृषी पंप वीज धोरणास अलिकडेच मंजूरी प्राप्त झाली आहे. यानुसार दरवर्षी एक लाख कृषिपंपाना सौर उर्जेद्वारे वीज जोडण्या देण्यात येणार असून या पंपांना योग्य दाबाचा पुरवठा मिळावा म्हणून पायाभूत सुविधांची निर्मिती करण्यासाठी दरवर्षी 1500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

या सारखी ताजी माहिती मिळविण्यासाठी जॉईन करा कृषी पंढरीचे टेलेग्राम चनेल. क्लिक करा पुढील लिंकवर https://t.me/krishipandhari 

Exit mobile version