विदर्भातील पशुसंवर्धन क्षेत्राकडे लक्ष देणे आवश्यक असून ज्याप्रमाणे मानवी आरोग्यासाठी सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल, प्राथमिक आरोग्य केंद्र अशा स्तरावरील वैद्यकीय सुविधा उपलब्ध असतात. त्याचप्रमाणे पशुनासुद्धा या प्रकारच्या वैद्यकीय सुविधा मिळण्यासाठी पशुवैद्यकीय सुविधांचे विकेंद्रीकरण होणे गरजेचे आहे, प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज नागपुरात केलं. राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत नागपूरच्या धरमपेठ भागात व्हेटर्नरी क्लीनिकल कॉम्प्लेक्स बिल्डिंगचे लोकार्पण गडकरींनी केलं त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी राज्याचे पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री सुनील केदार, खासदार डॉ. विकास महात्मे, महाराष्ट्र पशु आणि मत्स्यविज्ञान विद्यापीठ नागपूर-माफसुचे कुलगुरू डॉ. पातुरकर यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.
विदर्भातील दुग्ध उत्पादन वाढण्यासाठी ‘इन विट्रो फर्टिलायझेशन’ ची सुविधा असणाऱ्या तसेच 10 कोटीच्या तरतुदीने बांधण्यात आलेल्या प्रयोगशाळेला माफसुने प्रयोगाद्वारे विकसित करून 3 वर्षामध्ये दुग्ध उत्पादन दुप्पट करून दाखवावे असे आवाहन नितीन गडकरी यांनी केलं. माफसूचे संशोधन हे शेतकऱ्यांपर्यंत पोचले पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी गीर आणि साहिवाल या गाईंचे सेक्स सोर्टेड सीमेन फक्त 82 रूपात उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी केदार यांचे आभार मानले.
विदर्भामध्ये कृषिमाल तसेच इतर मत्स्यव्यवसाय यामध्येसुद्धा विपुल निर्यातीच्या संधी उपलब्ध असून भंडारा गडचिरोली येथील मालगुजारी तलाव तसेच गोड्या पाण्यातील झिंगे दुबई आणि इतर देशात निर्यात केले तर विदर्भातील विकास दर वाढू शकतो अशी अपेक्षा गडकरींनी व्यक्त केली . महाराष्ट्राला सातशे किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला असून कोकण किनारपट्टीत जर ट्रॉलर किंवा फिशिंग बोट या 100 नॉटिकल माईन पर्यंत नेण्याची क्षमता विकसित झाली तर या वापरामुळे मत्स्यउत्पादन हे अनेक पटीने वाढेल तसेच भारताची ब्ल्यू इकॉनोमी 7 लाख कोटी रुपया ची होऊ शकेल असेही त्यांनी निती आयोगाच्या एका अहवालाच्या आधारे सांगितलं.
राज्याचे पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांनी पशुसंवर्धन क्षेत्रात शेळ्या आणि मेंढ्या वर संशोधन करण्यास आपला भर राहील असे सांगितलं.
कार्यक्रमास माफसूचे अधिकारी उपस्थित होते.