पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

पुणे, दि. 5 : ज्येष्ठ समाजसेविका पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्यावर ठोसर पागा स्मशानभूमी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

शासनाच्यावतीने कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी स्वर्गीय सिंधुताई यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, अपर जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख , अपर पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे , पोलीस उपायुक्त प्रियंका नारनवरे यांनीही स्वर्गीय सिंधुताई यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.

पोलीस दलातर्फे त्यांना शोकप्रसंगीचे बिगूल वाजवून आणि बंदूकीच्या तीन फैरी झाडून सशस्त्र मानवंदना देण्यात आली.

स्वर्गीय सिंधुताई यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी उपविभागीय अधिकारी संतोषकुमार देशमुख, पुणे शहर तहसीलदार राधिका बारटक्के यांच्यासह कला, साहित्य, सांस्कृतिक, सामाजिक व विविध क्षेत्रातील नागरीक उपस्थित होते.

“सिंधुताईंच्या जाण्याने असंख्य मुले पोरकी झाली” – राज्यपाल

स्वतःच्या जीवनात अतिशय विपरीत परिस्थिती येऊन देखील सिंधुताईंनी स्वतःला सावरले व पुढे त्या हजारो अनाथ मुला – मुलींच्या आई होऊन त्यांचे जीवन सावरले. वात्सल्यमूर्ती सिंधुताई यांच्या निधनाने असंख्य लेकरे पोरकी झाली आहेत. या महान मातेला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. परमेश्वर दिवंगत आत्म्यास आपल्या श्रीचरणांजवळ स्थान देवो व त्यांच्या सर्व लेकरांना हे दुःख सहन करण्याचे सामर्थ्य देवोही प्रार्थना करतो असे राज्यपालांनी आपल्या शोक संदेशामध्ये म्हटले आहे.