– अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ
महाराष्ट्रात विविध भागात पावसाने थैमान घातले. यात शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. यातील अनेक भागांमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि खासदार शरद पवार हे भेटी देत आहेत. त्याचप्रमाणे नाशिकच्या इगतपुरी तालुक्यात नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली आहे. ज्यांचे घर पाण्याखाली बुडाले, काही ठिकाणी घरे वाहून गेलेली आहेत, अनेकांची शेती वाहून गेली आहे अश्या निराधार कुटुंबाना मोफत अन्नधान्य पुरवठा करणार असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.
सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड या भागातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी शेती, रस्ते वाहून गेले आहेत. काही घरे दोन-दोन दिवस पाण्याखाली होती. अशा पूरग्रस्तांना मदत म्हणून शासनाकडून प्रतिकुटुंब १० किलो गहू, १० किलो तांदूळ आणि ५ लिटर केरोसिनचा मोफत पुरवठा केला जाणार आहे.
राज्यातील अतिवृष्टी व पूर यामुळे बाधित झालेल्या आपद्ग्रस्तांना अन्नधान्य वाटप करण्याबाबतच्या ०८ मार्च २०१९ च्या (सीएलएस-२०१८/प्र.क्र.२२५/म-३) शासन निर्णयानुसार ही मदत देणार असल्याची माहिती भुजबळ यांनी दिली आहे.
आपत्तीग्रस्तांना धनादेशाचे वाटप
मुख्यमंत्री ठाकरे यांनी काल सोलापूर जिल्ह्याच्या अक्कलकोट तालुक्यातील रामपूर येथे आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधून समस्या जाणून घेतल्या. यावेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, कृषिमंत्री दादाजी भुसे, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी, आमदार सचिन कल्याणशेट्टी, मुख्यमंत्री कार्यालयाचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, विभागीय आयुक्त सौरभ राव आदी उपस्थित होते.
यावेळी आपत्तीग्रस्त रमेश बिराजदार, लक्ष्मण कोणदे, शोभा बिराजदार, नागेंद्र बिराजदार, चन्नव्वा वाघमारे यांना प्रातिनिधीक स्वरूपात मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते मदतीचे धनादेश देण्यात आले.
ठाकरे यांनी बोरी नदीची पाहणी करून नुकसान झालेल्या भागाची त्वरित डागडुजी करण्याचे निर्देश दिले.