पश्चिम मध्य प्रदेश, पूर्व राजस्थान, गुजरात आणि उप-हिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीम मध्ये तुरळक ठिकाणी अतिवृष्टीसह मुसळधार ते अति- मुसळधार पाऊस; मध्य महाराष्ट्र, आसाम आणि कोकण आणि गोवा मध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार ते अति-मुसळधार पाऊस आणि पूर्व मध्य प्रदेश, अरुणाचल प्रदेश आणि कर्नाटक किनारपट्टी भागात तुरळक ठिकाणी आज सकाळी मुसळधार पाऊस झाला.
20 ठिकाणी (बिहारमधील 7,उत्तर प्रदेशात 4 ,ओडिशा आणि महाराष्ट्रात प्रत्येकी 2 , आसाम, गुजरात, झारखंड, मध्य प्रदेश आणि पश्चिम बंगालमधील प्रत्येकी एक) गंभीर पूर परिस्थिती (धोक्याच्या पातळीच्या वर) आणि 24 ठिकाणी ( बिहारमध्ये 14 , उत्तर प्रदेशात 6 , आसाम आणि ओदिशामध्ये प्रत्येकी 2 ) सामान्य पूर परिस्थितीपेक्षा जास्त पातळीवरून (इशारा पातळीच्या वर) वाहत आहेत. 30 बंधारे आणि धरणे (मध्य प्रदेशात 8, कर्नाटक, महाराष्ट्र, राजस्थान आणि उत्तर प्रदेशात प्रत्येकी 3, आंध्र प्रदेश, झारखंड, पश्चिम बंगाल, तामिळनाडूमध्ये प्रत्येकी 2 , ओदिशा आणि गुजरातमधील प्रत्येकी 1 ) यामध्ये जमा होणाऱ्या पाणीसाठ्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
पाऊस कमी झाल्यामुळे मध्य प्रदेशातील नर्मदा, तापी, चंबळ, आणि महाराष्ट्रातील वैनगंगा आणि वर्धा नद्या वरच्या भागातील पाणी पातळी कमी झाली आहे. पुढील 48 तासांसाठी आणखी पावसाचा अंदाज वर्तवण्यात न आल्यामुळे मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील पूरपरिस्थितीत लक्षणीय सुधारणा होण्याची शक्यता आहे.
पुढील तीन दिवसांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाच्या अंदाजानुसार गुजरातमधील नर्मदा, माही,साबरमती आणि कोकण आणि गोव्यातील पश्चिमेकडे वाहणाऱ्या नद्यांचा प्रवाह वाढण्याची शक्यता आहे.
वरील सर्व राज्ये आणि जिल्ह्यात पुढील 3-4 दिवस बारीक लक्ष ठेवले जाईल. धरणांमधील पाण्याच्या वाढत्या ओघावर बारीक लक्ष ठेवण्याची सूचना देण्यात आली आहे.खालच्या भागातील गावांना आगाऊ सूचना दिल्यानंतरच वरील धरणांमधून प्रमाणित कार्य पद्धतीनुसार विसर्ग करणे गरजेचे आहे.
या नद्यांवरील रेल्वे रूळ आणि रस्ते तसेच पुलांवर जास्तीत जास्त लक्ष ठेवावे लागेल आणि कोणतीही दुर्घटना घडू नये म्हणून वाहतुकीचे योग्य नियमन करणे आवश्यक आहे. तसेच नद्यांच्या जवळ असलेल्या सखल भागातील मार्ग आणि रेल्वे रुळांवर देखील बारीक लक्ष ठेवण्याची गरज आहे. या जिल्ह्यांमध्ये मदत शिबिरांची उभारणी करत असताना सध्याच्या काळातील कोविड-19 ची स्थिती लक्षात घेऊन सर्व जिल्हा प्रशासनांनी प्रभावी उपाययोजना कराव्यात.