Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

“फिट इंडिया हे मोबाईल ॲप भारतीयांसाठी सुरु

क्रीडा दिनानिमित्त केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग सिंग ठाकूर यांनी फिट इंडिया मोबाईल ॲप सुरु केले

महत्त्वाची वैशिष्ट्ये :

फिट इंडिया चळवळीचा दुसरा वर्धापनदिन साजरा करण्यासाठी आणि ‘आझादी का अमृत महोत्सव’ चा भाग म्हणून केंद्रीय युवक व्यवहार आणि क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी आजच्या क्रीडादिनाला नवी दिल्लीतील मेजर ध्यानचंद स्टेडीयम येथे झालेल्या कार्यक्रमात फिट इंडिया ॲपची सुरुवात केली.

या कार्यक्रमादरम्यान केंद्रीय मंत्र्यांनी भारतीय हॉकी संघाचा कप्तान मनप्रीत सिंग, मुष्टीयोद्धा संग्राम सिंग, क्रीडा पत्रकार अयाझ मेमन आणि पायलट कॅप्टन ॲनी दिव्या यांच्यासह इतरांशी आभासी पद्धतीने संवाद साधला.

फिट इंडिया ॲप हे मोफत उपलब्ध असलेले ॲप असून अँड्रॉईड आणि आयओएस अश्या दोन्ही प्रणालींच्या मंचावर ते इंग्रजी आणि हिंदी भाषेत उपलब्ध आहे. या ॲपचा वापर अत्यंत मूलभूत स्मार्टफोनद्वारे देखील करता आला पाहिजे हे लक्षात घेऊनच त्याची रचना करण्यात आली आहे.

 

फिट इंडिया चळवळीच्या दुसऱ्या वर्धापनदिनानिमित्त तसेच राष्ट्रीय क्रीडादिनानिमित्त सर्वांचे अभिनंदन करत, केंद्रीय मंत्री म्हणाले, “फिट इंडिया मोबाईल ॲप प्रत्येक भारतीयाला त्याच्या तंदुरुस्तीची पातळी तपासण्याची सोय अगदी त्याच्या हातात आणून देते. या ॲपमध्ये ‘फिटनेस स्कोअर’, अनिमेटेड व्हिडिओ, शारीरिक हालचालींवर लक्ष ठेवणारा ट्रॅकर आणि प्रत्येकाच्या व्यायामाची विशिष्ट गरज पूर्ण करणारा ‘माय प्लॅन’ अशी काही अत्यंत वैशिष्ट्ये आहेत.”

केंद्रीय मंत्री ठाकूर पुढे म्हणाले की, “गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वयाला साजेसे तंदुरुस्तीचे नियम लागू केले होते, हे नियम जागतिक आरोग्य संघटनेद्वारे प्रमाणित असून या बाबतीतील आंतरराष्ट्रीय मानके लक्षात घेऊन त्यांची रचना करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील ‘फिटनेस का डोस, आधा घंटा रोज’ या शब्दात देशातील लोकांना तंदुरुस्तीचा मंत्र दिला आहे.

“तंदुरुस्तीला प्रत्येक भारतीयाच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनविण्याच्या हेतूने माननीय पंतप्रधानांनी 29 ऑगस्ट 2019 ला “फिट इंडिया चळवळ” सुरु केली, आज ही चळवळ जन आंदोलनात रुपांतरीत झाली आहे! मी नागरिकांना असे आवाहन करतो की त्यांनी ‘आझादी का अमृत महोत्सव’ उपक्रम यशस्वी करण्यासाठी फिट इंडिया चळवळीमध्ये सार्वजनिक पातळीवर भाग घ्यावा.” असे त्यांनी पुढे सांगितले.

अनुराग ठाकूर पुढे म्हणाले की, राष्ट्र उभारणीच्या कार्यात युवकांनी आपले खऱ्या अर्थाने योगदान द्यावे, असे आपल्याला वाटत असेल तर युवकांची शारीरिक तंदुरुस्ती असणे याबद्दल, आपण सुनिश्चित असायला हवे. समाज माध्यमांवर या अप्लिकेशनला प्रसिद्धी देण्याबाबत त्यांनी प्रत्येकाला आवाहन केले. “हे अप्लिकेशन विनामूल्य आहे, परंतु ते आपल्या फिटनेससाठी अमूल्य असे सिद्ध होईल,” ते म्हणाले.

निशित प्रामाणिक म्हणाले की, देशबांधवांचे फिट इंडिया मूव्हमेंटसाठीचे जन आंदोलन हे अभूतपूर्व आहे. हे फिट इंडिया अप्लिकेशन नवभारताला फिट इंडिया बनवेल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न देखील साकार करेल, असे ते म्हणाले. श्री प्रामाणिक यांनी नमूद केले की, क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर हे फिट इंडियासाठी खरे आदर्श आहेत आणि ते प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहेत.

आभासी पद्धतीच्या संवादात्मक कार्यक्रमात, अप्लिकेशनची वैशिष्ट्ये ही वापरण्यास सुलभ असल्याचे आणि आरोग्याच्या मापदंडाचे निरीक्षण करण्यासाठी सोपी असल्याचे सांगत भारतीय हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंग याने या अप्लिकेशनचे कौतुक केले. या अप्लिकेशनच्या मदतीने, कामाच्या व्याग्र वेळापत्रकाच्या काळात पाणी पिणे आणि झोपेच्या कालावधीचे निरीक्षण करण्यामध्ये त्याचे महत्त्व वैमानिक असणाऱ्या अनी दिव्या, ह्यांनी अधोरेखित केले. शरीराच्या वरच्या भागाच्या क्षमतांसाठी सहाय्य ठरणारे सुधारित पुश-अप्स देखील तिने यावेळी सादर केले.

फिट इंडिया अप्लिकेशनचे एक वेगळे वैशिष्ट्य म्हणजे, प्रत्येक व्यक्तीला त्याला / तिला आपल्या वयाला अनुसरून फिटनेस चाचणी घेता येईल आणि योगाच्या संदर्भातील नियम लक्षात घेऊन शारीरिक व्यायामाच्या माध्यमातून फिटनेसची पातळी वाढविण्याबाबतच्या अचूक सूचना मिळवित आपला फिटनेस स्कोअर तपासून पाहता येईल. आपापली वैयक्तिक रित्या फिटनेस टेस्ट कशी करता येईल, हे समजून घेण्यासाठी यामध्ये एक अनिमेटेड व्हिडिओ देखील देण्यात आला आहे. पंतप्रधानांनी सुरू केलेल्या प्रत्येकाच्या वयाला अनुरूप असलेल्या फिटनेसबाबतच्या नियमांवर आधारित ही वैशिष्ट्ये आहेत.

हे “फिटनेस प्रोटोकॉल” (नियम) वेगवेगळ्या वयोगटामधील वापरकर्त्यांना फिट (तंदुरुस्त) राहण्यासाठी प्राथमिक पातळीवर आवश्यक असलेले वेगवेगळे व्यायामाचे प्रकार करण्यासाठी माहिती  देतात. या प्रोटोकॉलमध्ये व्यायामांचा समावेश आहे, ज्याचे सार्वत्रिकपणे पालन केले जाते आणि आरोग्य तज्ज्ञांनी देखील त्यासाठी मान्यता दिली आहे.

अतिरिक्त वैशिष्ट्ये:-

प्रत्येकाचे वय, लिंग, वर्तमान जीवनशैली आणि शरीर रचना यावर आधारित प्रत्येकजण वेगवेगळ्या प्रकारचे अन्न सेवन करीत असतो, शारीरिक क्रियाकलाप करतो आणि त्यानुसार त्याला हायड्रेशनची आवश्यकता असते. फिट इंडिया मोबाईल अप्लिकेशनमधील “My Plan” (माय प्लॅन) हे वैशिष्ट्य प्रत्येकाला त्याचे / तिचे ध्येय गाठण्यासाठी, आपापली वर्तमान जीवनशैली – व्यायामासाठी दिलेला वेळ, प्यायलेले पाणी, झोपेचे तास, वर्तमान वजन आणि उद्दिष्ट ठेवलेले वजन, वैयक्तिक गरजेनुसार दिलेले आहाराचे नियोजन, जीवनशैलीतील बदल याबाबतची माहिती देते. फिट इंडिया अप्लिकेशन हे भारतीय पद्धतीचे आहार नियोजन, किती ग्लास पाणी प्यावे आणि किती तास झोप घ्यावी, हे सुचविते.

कोणालाही आपल्या दैनंदिन वैयक्तिक क्रियाकलापांच्या (शारीरिक व्यायाम) पातळीचा पाठपुरावा करण्यासाठी “अक्टिव्हिटी ट्रॅकर” हे वैशिष्ट्य मदत करते. रियल टाइम स्टेप ट्रॅकरमुळे व्यक्तीला आपल्या रोजच्या चालण्याचा पाठपुरावा करण्यासाठी आणि स्वतःसाठी मोठी ध्येये डोळ्यासमोर ठेवण्याबाबत प्रोत्साहन देण्यासाठी उपयुक्त आहे. या अप्लिकेशनमुळे  व्यक्तीला त्यांचा दैनंदिन पाणी पिण्याचा, कॅलरी सेवनाचा आणि झोपेच्या तासांचा पाठपुरावा देखील करता येणार आहे.

व्यक्तीला तासिकांच्या स्वरूपात या अप्लिकेशनमध्ये आपल्या फिटनेस स्कोअरची प्रगती तपासून पाहण्यासाठी रिमाइंडर लावता येणार आहे आणि ठराविक कालावधीत दैनंदिन व्यायाम करणे, इतर अधिकाधिक लोकांना फिटनेसबाबत प्रोत्साहन देण्यासाठी तसेच जीवनशैलीतील बदलांसाठी उद्युक्त करण्यासाठी, व्यक्तीला त्यांचा फिटनेस आणि क्रियाकलापांची सविस्तर माहिती इतरांबरोबर शेअर करणे शक्य होणार आहे.

फिट इंडियाच्या विविध कार्यक्रमांमध्ये, प्रमाणित उपक्रम इत्यादींमध्ये सहभागी होण्याची संधी या अप्लिकेशनमुळे व्यक्तींना, शाळांना, गटांना आणि संस्थांना संधी आहे, लोकांना त्यांच्या फिटनेसबाबतच्या यशस्वी कथा देखील या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून इतरांना सांगता येऊ शकतील.

Exit mobile version