Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

खरिपातील खतांसाठी सरकारने केल्या विविध उपाययोजना

खरीप 2021 हंगामात खतांच्या उपलब्धतेचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय मंत्री (रसायने आणि खते ) डी. व्ही. सदानंद गौडा आणि राज्यमंत्री (रसायने आणि खते ) मनसुख एल. मांडवीय यांनी 12.04.2021 रोजी 4 आघाडीच्या उत्पादक / आयातदारांबरोबर बैठक घेतली. बैठकीला खत विभागाचे वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते. विविध कंपन्यांनी सूचित केल्यानुसार देशांतर्गत उत्पादन व विविध खत / कच्च्या मालाची अपेक्षित आयात यावर सविस्तर चर्चा झाली.

देशात युरियाच्या उपलब्धतेसंदर्भात, यूरिया कारखान्यांचे पुनरुज्जीवन करण्याच्या दृष्टीने सरकारने केलेल्या प्रयत्नांचे उद्योगानी कौतुक केले . यामुळे आगामी काळात आयात अवलंबत्व कमी होईल. चालू खरीप 2021 हंगामात सर्व राज्यांत यूरियाची पुरेशी उपलब्धता असेल असे खत विभागाच्या सचिवांनी सांगितले.

खरीप 2021 हंगामात फॉस्फेट आणि पोटॅशियम युक्त (पी अँड के ) खते शेतकऱ्यांना वेळेवर आणि पुरेशा प्रमाणात उपलब्ध करुन देण्यात येतील, यासाठी प्रत्येक कंपनीच्या सज्जतेचे मूल्यांकन करण्यात आले. या कंपन्यांनी जागतिक स्तरावर कच्च्या मालाची आणि खतांच्या वाढत्या किमतीचे मुद्दे उपस्थित केले. फर्टिलायझर असोसिएशन ऑफ इंडिया (एफएआय) महासंचालक सतीश चंद्र यांनी केंद्रीय मंत्र्यांसमोर खरीप 2021 हंगामासाठी पहिल्या तीन महिन्यांमधील प्रत्यक्ष मागणीची पूर्तता करण्यासाठी विविध खतांचा आणि कच्च्या मालाचा पुरेसा साठा असल्याबाबत सादरीकरण केले.

इफ्कोने दिनांक 07.04.2021 च्या अधिसूचनेद्वारे फॉस्फेटिक खतांच्या किंमती वाढवल्याबाबत विस्तृत चर्चा झाली. जागतिक स्तरावर कच्च्या मालाच्या किंमतीत वाढ झाल्याबद्दल कंपन्यांची चिंता समजून घेण्यात आली. अमेरिका, ब्राझील आणि चीन या प्रमुख खत वापर बाजारपेठांकडून स्पर्धात्मक मागणी वाढल्यामुळे गेल्या तीन ते चार महिन्यांत कच्च्या मालाच्या आणि तयार उत्पादनांच्या आंतरराष्ट्रीय किमतींमध्ये वाढ झाली असल्याचे कंपन्यांनी नमूद केले. . पुरवठा वाजवी दराने सुरळीत सुरु राहण्यासाठी पुरवठादारांची समजूत काढण्यासाठी राजनैतिक माध्यमातून सरकारच्या हस्तक्षेपाची विनंती कंपन्यांनी केली.

सचिव (खते) यांनी विविध राज्यांसाठी विविध खतांची गरज याबाबत सादरीकरण केले आणि कंपन्यांना विविध खतांचा वेळेवर पुरवठा करण्याची सूचना केली. कंपन्यांनी आश्वासन दिले की येत्या काही दिवसात शेतकऱ्यांना वेळेवर, पुरेशी आणि परवडणाऱ्या किंमतीत खते उपलब्ध करुन देण्यात येतील. सर्व मोठ्या कंपन्यांनी स्पष्ट केले की किरकोळ दुकाने , गोदामे इत्यादी ठिकाणी सध्या पडून असलेला साठा जुन्या दराने उपलब्ध करुन देण्यात येईल. पी अँड के खतांच्या कोणत्याही किंमतीत बदल करण्यापूर्वी खत विभागाचा सल्ला घ्यावा. अशी सूचना रसायने आणि खत राज्यमंत्र्यांनी केली.

तसेच , कंपन्यांनी एफएआयला आश्वासन दिले की ते आंतरराष्ट्रीय पुरवठादारांबरोबर संयुक्तपणे चर्चा करतील आणि पी अँड के खतांच्या बाबतीत कच्चा माल आणि तयार उत्पादनांच्या बाबतीत सर्वोत्तम करार करण्यासाठी संयुक्त रणनीती अवलंबली जाईल.

Exit mobile version