शेतकऱ्यांनी धीर धरावा, शासन खंबीरपणे पाठीशी

 – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मदत करून शेतकऱ्यांचे अश्रू पुसणार

उस्मानाबाद, दि. २१  :- जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीची दैनंदिन माहिती प्रशासनाकडून घेतच होतो. शेतकऱ्यांनी धीर धरावा शासन खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे असून शेतकऱ्यांना मदत देण्याबाबतचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत लवकरच घेण्यात येणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तुळजापूर शासकीय विश्रामगृहाच्या सभागृहात आयोजित अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीबाबतच्या आढावा बैठकीत केले.

 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकर मदत देण्याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात येणार आहे. सर्व शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत पोहोचली पाहिजे. त्यासाठी प्रशासनाने शासनाकडे सर्व प्रस्ताव त्वरित पाठवावेत. शेतकऱ्यांना समाधानकारक दिलासा देऊन लवकरच सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे अश्रू पुसायचे आहेत.

मराठवाड्याच्या सर्वांगिण विकासासाठी जिल्हावार दीर्घकालीन उपाययोजनांचे प्रस्ताव सादर करावेत; पावसाचा पॅटर्न बदलत आहे, त्याप्रमाणे प्रशासनाने तयारी ठेवावी

मराठवाड्याच्या सर्वांगिण विकासासाठी प्रशासनाने दीर्घकालीन उपाययोजना सुचवाव्यात व त्याबाबतचा जिल्हा आराखडा तात्काळ सादर करावा तसेच हा आराखडा करत असताना त्यात कोणत्या कामाला प्राधान्य द्यावे त्याचाही कामनिहाय क्रम ठरवून घ्यावा. मराठवाड्याचा लातूर उस्मानाबाद हा भाग भूकंपप्रवण आहे त्या शक्यतेचा विचार करून प्रशासनाकडून पुढील काळात या भागात कोणत्याही प्रकारची नैसर्गिक आपत्ती आल्यास त्यावरील उपाययोजना सुचवाव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिले.

संपूर्ण राज्यात पावसाचा पॅटर्न बदलत असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे कोणत्या ठिकाणी कसा पाऊस पडून त्याचे आपत्तीत रूपांतर होईल याचा अंदाज बांधता येत नाही. काटगाव (ता. तुळजापूर) येथील पुलावरून आठ ते दहा फूट इतके पाणी गेले त्यामुळे या भागातील पिकांची मोठी हानी झाली. येणाऱ्या कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्याची तयारी पुढील काळात ठेवावी लागेल, असेही श्री.ठाकरे यांनी सांगितले.

 

सोयाबिन गंजीच्या नुकसानीबाबत विमा कंपनीकडून विमा संरक्षण मिळण्याबाबत योग्य तो निर्णय लवकरच घेण्यात येईल. जिल्हा प्रशासनाने अतिवृष्टी व या पुराच्या काळात जिल्ह्यातील 128 नागरिकांचे प्राण वाचवून जीवितहानी होऊ दिली नाही त्याबद्दल जिल्हा प्रशासनाच्या कामाचे तसेच नुकसानीच्या पंचनाम्याचे काम चांगले सुरू असल्याबद्दल मुख्यमंत्री ठाकरे यांनी कौतुक केले.

राज्यातील मंदिरे खुली करण्याबाबत लवकरच निर्णय घेऊ. परंतु सध्याच्या परिस्थितीत कोविडचा प्रसार होऊ नये यासाठी मंदिरे सुरू केलेली नाहीत. एकाचवेळी सर्व गोष्टी सुरू केल्याने परदेशांमध्ये कोविडची पुन्हा मोठी लाट आलेली दिसून येत आहे. तसेच सध्याची परिस्थिती अत्यंत गंभीर असून त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी ‘माझे कुटुंबाची जबाबदारी’ मोहिमेत सक्रिय सहभाग घेऊन कोविडचा प्रतिबंध करावा, असे आवाहन मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले.

यावेळी महसूल मंत्री थोरात म्हणाले, अतिवृष्टीने सोयाबीन, तूर, ऊस, कांदा आदी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून पुरामुळे जमिनीही खरडून गेल्या आहेत. शासनाकडून शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल. फलोत्पादन मंत्री भुमरे यांनी अतिवृष्टीने व पुरामुळे विहिरीमध्ये गाळ साठलेल्या ठिकाणी रोजगार हमी योजनेतून तो गाळ काढता येईल, असे सांगितले तसेच रोहियोतून पाणंद व शेत रस्ते घेता येतील असे सूचित केले.

पालकमंत्री शंकरराव गडाख म्हणाले, उस्मानाबाद जिल्ह्यातील 3 लाख 74 हजार हेक्‍टर क्षेत्रावर सोयाबिन हे पीक होते. अतिवृष्टीने या पिकाचे प्रचंड नुकसान झाले असून आतापर्यंत 50 ते 60 टक्के नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. जिल्ह्यातील लघु, मध्यम व मोठ्या प्रकल्पाचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून त्याच्या दुरुस्तीसाठी जवळपास 50 ते 60 कोटी खर्च येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

यावेळी खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर, आमदार राणाजगजितसिंह सिंह पाटील यांनी शेतकऱ्यांच्या समस्या मांडून त्या सोडविण्याची मागणी केली. विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी मराठवाड्यातील जिल्ह्यातील अतिवृष्टी व पंचनाम्याची माहिती सादर केली.

जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी उस्मानाबाद जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी संदर्भात माहिती देऊन ऑक्टोबर महिन्यात दोनशे मिलिमीटर पाऊस  झाल्याचे सांगितले. अतिवृष्टी व पुरामुळे जिल्ह्यातील एक लाख 56 हजार हेक्‍टर क्षेत्र बाधित झाल्याची प्राथमिक माहिती असून प्रशासनाने आतापर्यंत एक लाख शेतकऱ्यांपर्यंत पोहचून पंचनामे पूर्ण केलेले आहेत उर्वरित पंचनामे पूर्ण करण्याची कार्यवाही वेगाने सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.

उस्मानाबाद जिल्ह्यात अतिवृष्टीच्या काळात वीज पडून दोन नागरिकांचे प्राण गेले. प्रशासनाकडून त्यांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात मदतीचे धनादेश देण्यात आले.

 तुळजापूर तालुक्यातील काटगाव येथील पीक नुकसानीची पाहणी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उस्मानाबाद जिल्ह्यातील पीक नुकसानीच्या पाहणीची सुरुवात काटगाव (ता. तुळजापूर) येथील शेती पिकाच्या नुकसानीची पाहणी करून झाली. यावेळी येथील पुलावरून आठ ते दहा फूट पाणी गेल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. सोयाबीन, ऊस व द्राक्ष या पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याचे सांगितले. मुख्यमंत्री ठाकरे यांनी येथील शेतकऱ्यांना धीर दिला व शासन सर्व शेतकऱ्यांच्या पाठीशी असून या नुकसानीबाबत लवकरच मदत देणार असल्याचे सांगितले. यावेळी हरिदास माळी व इतर शेतकऱ्यांशी मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला. काटगाव ग्रामस्थांची भेट घेऊन आज येथे तुम्हाला भेटण्यासाठी व या आपत्तीच्या परिस्थितीत दिलासा देण्यासाठी आलो असल्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले. यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी कात्री अपसिंगा (ता. तुळजापूर) या गावास भेट देऊन तेथील पीक नुकसानीची पाहणी केली.