पुढाऱ्यांना गाव बंदी चा इशारा
निफाड ( प्रतिनिधी ) : नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेने थकीत कर्जदार शेतकऱ्यांना जमीन जप्तीच्या नोटिसा दिल्या शेतकरी संतप्त झाले आहेत. निफाड तालुका शेतकरी बचाव कृती समितीने बोलावलेल्या बैठकीत जिल्हा बॅंकेने जमीन जप्ती मागे न घेतल्यास शेतकऱ्यांना घेऊन रास्ता रोको, रेल रोको आंदोलनाचा व राजकीय पुढाऱ्यांना गाव बंदी करण्याचा इशारा देण्यात आला.
जिल्हा बँकेच्या जमीन जप्ती नोटिसा विरोधात निफाड तालुक्यातील विविध कार्यकारी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक निफाड येथे पार पडली. या बैठकीला 81 संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. कृती समितीचे अध्यक्ष तथा राष्ट्रीय किसान करणी सेनेचे अध्यक्ष मधुकरराव ढोमसे हे अध्यक्षस्थानी होते. यावेळी त्यांनी बोलताना सांगितले की जिल्हा बँकेने शेतकऱ्यांच्या जमीन जप्तीचा घाट घातला आहे याविरोधात शेतकरी कृती समिती आक्रमक भूमिका घेत हायकोर्टात रिट याचिका दाखल करणार असून याविरोधात राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना जिल्हा बँकेच्या अन्यायकारी भूमिका ची माहिती देऊन राज्य अधिवेशनात हा प्रश्न मांडण्याची आग्रही भूमिका घेणार आहोत.
जिल्हा बँकेने आपल्या भूमिकेत बदल केला नाही तर रास्ता रोको, रेल्वे रोको तसेच राजकीय पुढार्यांना गावबंदी करणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. याप्रसंगी पंचायत समितीचे सदस्य शिवा सुराशे अश्फाक शेख, जगन कुटे, वाल्मीक सांगळे , संपत डुंबरे, सरपंच निवृत्ती कोडले आदींनी आपली भूमिका मांडली. यावेळी रयत क्रांती शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शिवनाथ जाधव, दत्ता सुडके, प्रभाकर मापारी, केशव जाधव, संजय वाबळे, रामकृष्ण दराडे, अब्दुल शेख, विलास मंडलिक, तसेच शेतकरी बचाव कृती समितीचे पदाधिकारी उपस्थित होते .