शेतकरी मित्रांनो; कामाचा ताण येत असेल तर त्यावर वापर या नैसर्गिक औषधी

तुम्ही सतत तणावात असाल किंवा तुमच्या मनाला एखादी चिंता खात असेल तर त्याचा परिणाम तुमच्या शरीरावर, झोपेवर, कौटुंबिक सामाजिक नात्यांवरही होईल. त्यामुळे ताणतणावांवर उतारा म्हणून तुम्ही औषधांऐवजी नैसर्गिक पद्धतींनी मात करू शकता. अशाच काही नैसर्गिक औषधी वनस्पतींची माहिती…

अलिकडील अस्थिरतेच्या काळात बहुतेक लोकांमध्ये तणाव, चिंता, नैराश्य यांसारख्या मानसिक समस्यांनी मोठ्या प्रमाणावर घेरले आहे. अनेकांना नोकरी, मुलांच्या शिक्षणाची, रोजीरोटीची चिंता आहे. कामाचा ताण असो किंवा इतर कोणतीही शारीरिक, मानसिक, भावनिक समस्या असोत, या सर्व गोष्टी तणाव, चिंता वाढवतात. काही लोक तणाव आणि चिंता दूर करण्यासाठी स्वतःहून औषधे घेण्यास सुरुवात करतात, ज्यामुळे ते मन शांत करतात. परंतु अशा औषधांच्या सेवनाने आपल्या आरोग्यास हानी पोहोचू शकते. पण या समस्यांवर तुम्ही नैसर्गिक पद्धतींनी मात करू शकता. काही नैसर्गिक औषधी वनस्पती ताणतणाव आणि चिंता कमी करण्यास मदत करतात. त्यांचे सेवन केल्याने आरोग्याला कोणतीही हानी पोहोचत नाही. अशाच काही नैसर्गिक औषधी वनस्पतींची माहितीः

शंखपुष्पीः
हे औषधी मज्जासंस्थेला चालना देते. शंखपुष्पीमुळे पोट साफ होते, बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते. त्याला एक चांगले ब्रेन टॉमिक म्हटले आहे. अनेक वेळा तणावामुळे केसही खूप गळतात. अशा वेळी शंखपुष्पीच्या सेवनाने केस गळणे नियंत्रणात राहते.

जटामासीः
जटामासी ही औषधी वनस्पती तणावामुळे उद्भवणाऱ्या निद्रानाशावर उपचार करते. हे टॅब्लेट, पावडर स्वरूपात उपलब्ध आहे. जटामासीमुळे मेंदूचे कार्य सुरळीत राहते. मेंदूच्या पेशींना झालेले नुकसान भरून काढण्यास ही औषधी मदत करते. त्यात अँटिऑक्सिडंट असल्याने चिंता, निद्रानाशाचा त्रास कमी होऊन मन शांत होते.

अश्वगंधाः
अश्वगंधा एक उत्कृष्ट आयुर्वेदिक औषध आहे, ज्याचा उपयोग अनेक रोगांवर उपचार करण्यासाठी केला जातो. त्याची मुळे जास्त वापरली जातात. त्याला अश्वगंधा मूळ म्हणतात. त्याची मुळे पावडर स्वरूपात घेता येतात. अश्वगंधामुळे तणावामुळे वाढणारा रक्तदाब कमी होतो. ही औषधी रोगप्रतिकारशक्ती वाढवते. मेंदू आणि चेतापेशींमधील जळजळ दूर करते. तणाव आणि चिंता दूर करण्यासाठी ही एक चांगली औषधी वनस्पती मानली जाते. त्यामुळे मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य टिकून राहते. सांधेदुखी, कमजोरी, थकवा, स्नायू दुखणे अशी समस्या असल्यास याचे सेवन करा. यामुळे मेंदूतील रक्त परिसंचरण सुधारते.

ब्राह्मीः
ब्राह्मी ही एक अतिशय उपयुक्त औषधी वनस्पती आहे. तणाव, चिंता, अल्झायमर्स, अटेंशन डेफिसिट हायपरएक्टिव्हिटी डिसऑर्डर इत्यादीसारख्या अनेक मानसिक-शारीरिक समस्या दूर करण्यासाठी ब्राह्मीचा उपयोग होतो. ही औषधी स्मरणशक्ती वाढवते. पण ब्राह्मीचे सेवन तज्ञांच्या सल्ल्यानेच करावे. ब्राह्मी गोळ्या, सरबत, घृत, पावडरच्या स्वरूपात बाजारात उपलब्ध आहे. तुमची समस्या आणि प्रकृतीचे विश्लेषण केल्यानंतर, तुम्ही ते कोणत्या स्वरूपात सेवन करायचे हे डॉक्टर सांगतात. काहींना चिंतेमुळे जास्त पित्ताचा त्रास होतो, अशावेळी ब्राह्मी तुपाच्या रूपात घेता येते. स्मरणशक्ती वाढवण्यासाठी, रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी आणि तणावावर नियंत्रण ठेवण्यासाठी सिरप किंवा टॅब्लेटच्या स्वरूपात देखील घेतले जाऊ शकते.

(वरील औषधी तज्ज्ञांच्या सहाय्याने घेतल्यास त्याचा फायदा होईल.)