Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

देशभरात 100 ठिकाणी किसान ड्रोन कार्यरत

देशभरात 100 ठिकाणी किसान ड्रोनची उड्डाणे पाहून मला आनंद झाला, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

आपल्या ट्वीट संदेशामध्ये पंतप्रधान म्हणाले;

“किसान ड्रोन देशभरात 100 ठिकाणी कार्यरत झालेली पाहून मला आनंद झाला आहे. हा @garuda_india या नवोन्मेशशाली स्टार्ट-अपचा प्रशंसनीय  उपक्रम आहे. असे नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान आपल्या शेतकऱ्यांना सक्षम करेल आणि शेती अधिक लाभदायक होईल.”

 

 कृषी ड्रोनच्या उड्डाण प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

नमस्कार!

जर तुमची धोरणे योग्य असतील तर देशा किती उंच भरारी मारू शकतो, याचे आअजचा दिवस म्हणजे एक मोठे उदाहरण आहे. काही वर्षांपर्यंत देशात ज्यावेळी ड्रोनचे नाव घेतले जात होते, त्यावेळी असे वाटत होते की, ही काहीतरी संरक्षण खात्याविषयीची व्यवस्था, योजना असेल. ही गोष्ट शत्रूशी दोन हात करण्यासाठी वापरण्यात येणारी वस्तू असेल. त्यादृष्टीनेच ड्रोनविषयी विचार केला जात होता. मात्र आज आपण मानेसरमध्ये शेतकरी बांधवांसाठी ड्रोन सुविधा सुरू करीत आहोत. हा 21 व्या शतकातला आधुनिक कृषी व्यवस्थेच्या दिशेने सुरू झालेला एक नवीन अध्याय आहे. मला विश्वास आहे की, आज करण्यात आलेला प्रारंभ म्हणजे काही फक्त सुरूवात नाही तर ड्रोन क्षेत्राच्या विकासामध्ये मैलाचा दगड ठरेल. इतकेच नाही तर, यामध्ये असलेल्या अनेक शक्यता प्रत्यक्षात येण्यासाठी जणू अनंत आकाश मुक्त होईल.  गरूड एअरोस्पेसने आगामी दोन वर्षांमध्ये एक लाख ‘मेड इन इंडिया’ ड्रोन बनविण्याचे लक्ष्य निश्चित केले आहे, असेही मला  सांगण्यात आले आहे. यामुळे अनेक युवकांना नवीन रोजगार आणि नवीन संधी मिळणार आहेत. यासाठी मी गरूड एअरोस्पेसच्या समूहाचे, सर्व नवयुवा सहकार्यांचे अभिनंदन करतो.

 

मित्रांनो,

देशासाठी आजचा काळ हा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा आहे. हा काळ युवा भारताचा आहे आणि भारताच्या युवकांचा काळ आहे. गेल्या काही वर्षांमध्ये देशामध्ये ज्या काही सुधारणा घडून आल्या आहेत, त्यामुळे युवावर्ग आणि खाजगी क्षेत्राला एक नवीन ताकद, ऊर्जा मिळाली आहे. ड्रोनविषयीही भारताने शंका उपस्थित करून कोणत्याही प्रकारे वेळ वाया घालवला नाही. आम्ही युवकांच्या हुशारीवर, बुद्धिमत्तेवर विश्वास दाखवला. आणि नवीन विचाराचा स्वीकार करून पुढे चाललो आहोत.

यंदाच्या अंदाजपत्रकामध्ये करण्यात आलेल्या घोषणांविषयी इतर धोरणात्मक निर्णयामध्ये देशाने मोकळेपणान तंत्रज्ञान आणि  नवसंकल्पना यांना प्राधान्य दिले आहे. त्याचा परिणाम आज आपल्या समोर आहे. सध्याच्या काळामध्ये ड्रोनचा उपयोग कितीतरी विविध कारणांसाठी केला जावू शकतो, हे आपण पाहतोच आहे. अलिकडेच बीटिंग रिट्रीटच्यावेळी एक हजार ड्रोन्सने केलेले अतिशय देखणे प्रदर्शन संपूर्ण देशाने पाहिले आहे.

आज स्वामित्व योजनेअंतर्गत गावांमध्ये ड्रोनच्या मदतीने जमीन, घरे यांच्या माहितीची नोंदवही तयार केली जात आहे. ड्रोनच्या मदतीने औषधांचा पुरवठा केला जात आहे. अतिशय दुर्गम ठिकाणी कोरोनारोधक लस पोहोचविण्याचे काम ड्रोनच्या मदतीने करण्यात आले आहे. अनेक स्थानी शेतांमध्ये औषधांची फवारणी करण्याचे कामही या ड्रोनच्या मदतीने सुरू करण्यात आले आहे. कृषी ड्रोन म्हणजे आता या दिशेने टाकलेले एक नवीन युगाच्या क्रांतीचा प्रारंभ आहे. उदाहरणच द्यायचे झाले तर आगामी काळामध्ये उच्च क्षमतेच्या ड्रोनच्या मदतीने शेतकरी आपल्या शेतांतून ताज्या भाज्या, फळे, फुले बाजारामध्ये पाठवू शकतात. मासे पालनाबरोबर जोडले गेलेले लोक तलाव, नदी आणि सागर या तिन्ही ठिकाणचे ताजे मासे थेट मासळी बाजारामध्ये पाठवू शकतात. नाशवंत मालाचे  कमी वेळेमध्ये वितरण व्हावे आणि कमीत कमी नाश व्हावा, कमीत कमी नुकसान व्हावे,  यासाठी मत्स्य व्यावसायिक, शेतकरी यांनी  आपला माल ड्रोनने बाजारात पाठवला तर माझ्या शेतकरी बंधूची, माझ्या मत्स्यपालक बंधू-भगिनीचेही उत्पन्न वाढेल. अशा अनेक शक्यता, संधी  आपल्यासमोर दार ठोठावत आहेत.

देशातल्या आणखी काही कंपन्याही या दिशेने वेगाने पुढे जात आहेत. भारतामध्ये ड्रोन स्टार्ट-अप्समध्ये एक नवीन परिसंस्था तयार होत आहे. आत्ता देशामध्ये 200 पेक्षा जास्त ड्रोन स्टार्टअप्स कार्यरत आहेत. लवकरच यांची संख्या हजारोंमध्ये पोहोचेल. यामुळे रोजगाराच्याही  लाखो नवीन संधी निर्माण होतील. मला विश्वास आहे, आगामी काळामध्ये भारताचे हे वाढते सामर्थ्य संपूर्ण जगाला ड्रोनच्या क्षेत्रामध्ये नवीन नेतृत्व देईल. या विश्वासाबरोबरच तुम्हा सर्वांना खूप-खूप धन्यवाद! माझ्यातर्फे खूप-खूप शुभेच्छा आहेत.

नवतरूणांच्या साहसाला माझ्या शुभेच्छा आहेत. आज जे स्टार्ट-अपचे विश्व निर्माण झाले आहे, हे युवक साहस दाखवत आहेत, मोठा धोका पत्करत आहेत, त्यासाठी मी तुम्हा सर्वांना खूप -खूप शुभेच्छा देतो. आणि भारत सरकार आपल्या धोरणांच्या माध्यमातून सातत्याने आपल्याबरोबर राहून, अगदी खांद्याला खांदा लावून सर्वांना बरोबर घेवून पुढे जाण्यासाठी कोणत्याही प्रकारची अडथळे येवू देणार नाही. आपल्या सर्वांना मी खूप-खूप सदिच्छा देतो.

खूप-खूप धन्यवाद!!

Exit mobile version