मुंबई, दि. 16 : अंगणवाडीतील बालकांना सर्व प्रकारच्या सुविधा देणे ही शासनाची जबाबदारी असून, राज्यातील सर्व अंगणवाड्यांसाठी सुसज्ज जागा आणि सर्व सुविधा देण्यासाठी जलदकृती कार्यक्रम राबवून ही कामे एका वर्षात पूर्ण करण्यात येतील. वाढती लोकसंख्या आणि मागणीनुसार नवीन अंगणवाडी सुरू करण्यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्यात येत असल्याचे महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी विधानसभेत सांगितले.
यवतमाळ जिल्ह्यातील बोदाड येथील अंगणवाडी इमारत बांधकामास निधी उपलब्ध करून देण्यासंदर्भात सदस्य संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला महिला व बालविकासमंत्री ॲड. ठाकूर यांनी उत्तर दिले. सदस्य राहुल कुल, संग्राम थोपटे, प्रणिती शिंदे, आशिष शेलार, रईस शेख, नमिता मुंदडा यांनी यावेळी उपप्रश्न विचारले. अर्थसंकल्पात महिला व बालविकास विभागासाठी तीन टक्के निधी उपलब्ध करून देण्यात आला असून त्याचा योग्य वापर करून राज्यातील सर्व अंगणवाड्यांना इमारत उपलब्ध करून त्यांना सर्व सुविधा देण्याचा शासनाचा मानस असल्याचे ॲड. ठाकूर यांनी सांगितले.
यवतमाळ जिल्ह्यातील बोदाड येथील अंगणवाडीच्या इमारतीच्या जागेवर अतिक्रमण असल्याने बांधकामास विलंब होत आहे. त्याच परिसरातील नजिकच्या शाळेत अंगणवाडीसाठी वर्ग उपलब्ध करून देण्यात आला होता, मात्र बांधकामाच्या विलंबास कारणीभूत ठरलेल्या संबंधित अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्यात येणार आहे. ज्या अंगणवाड्यांचे काम अर्धवट अवस्थेत असेल तेथे जिल्हा वार्षिक नियोजन समितीतील निधी वापरला जाईल आणि जिल्हाधिकारी यांच्या अखत्यारित येणाऱ्या अधिकारांचा वापर करून प्रलंबित कामे पूर्ण करण्यात येतील, असेही मंत्री ॲड. ठाकूर यांनी सांगितले.
सोलापूर जिल्ह्यासह इतर जिल्ह्यात नवीन अंगणवाडी सुरू करण्यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा सुरु आहे. केंद्राकडून मंजूरी मिळताच नवीन अंगणवाडी उपलब्ध करून दिली जाणार असल्याची माहितीही ॲड. ठाकूर यांनी दिली.