Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

कृषिपंपांना त्वरित वीज जोडण्या देण्यासाठी ऊर्जामंत्र्यांचे निर्देश

मुंबई, दि. ९: वीज जोडण्यांसाठी प्रलंबित असलेल्या कृषिपंपांना त्वरित वीज जोडण्या देण्यासाठी उच्चदाब विद्युत वितरण प्रणाली योजनेची (एचव्हीडीएस) कामे जलद गतीने करा. वेळेत काम न करणाऱ्या कंत्राटदाराना काळ्या यादीत टाका, असे निर्देश ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज ‘महावितरण’ला दिले.

उच्चदाब विद्युत वितरण प्रणाली योजनेचा आढावा घेण्यासाठी मंत्रालयात डॉ. राऊत यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, ‘महावितरण’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, मराविमं सूत्रधारी कंपनीचे सल्लागार उत्तम झाल्टे आदी यावेळी उपस्थित होते.

एचव्हीडीएस योजना राबविताना गुणवत्तापूर्ण कामे करण्यासाठी कामाचे वेळोवेळी योग्य निरीक्षण करण्याच्या सूचना देऊन डॉ. राऊत यांनी मुख्य अभियंता व अधीक्षक अभियंता यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून एचव्हीडीएसच्या प्रलंबित  कामांचा आढावा घेऊन अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.

विशेष घटक योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व जमातीच्या अर्जदारांना वीज जोडण्या देण्यासाठी निधी उपलब्ध असून त्यासाठी तरतूद करण्यात आल्याची माहिती कार्यालयाच्या माहिती पत्रकावर ठळकपणे नमूद करून याला व्यापक प्रसिद्धी देण्याची सूचना त्यांनी यावेळी केली.

कोरोनाच्या काळात ही योजना राबविण्यात अडचणी निर्माण झाल्या. त्या अडचणी दूर करीत यापुढे ही योजना जलद गतीने राबविण्यात यावी, असे निर्देश त्यांनी दिलेत.

नागपूर प्रादेशिक विभागात एचव्हीडीएसचे सर्वाधिक ८३ टक्के काम पूर्ण झाले आहे तर औरंगाबाद प्रादेशिक विभागात ६४ टक्के, कोकण व पुणे  प्रादेशिक विभागात प्रत्येकी ७८ टक्के काम पूर्ण झाले आहे, असे या बैठकीत एका सादरीकरणात सांगण्यात आले.

Exit mobile version