हातमागाच्या माध्यमातून महिलांना रोजगार प्राप्ती

हातमागाच्या माध्यमातून नागपूर जिल्ह्यातील पाचगाव, बेला आता धापेवाडा येथे सुद्धा महिलांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असून विणकामाच्या प्रशिक्षणामधून  महिलांना रोजगार प्राप्ती तसेच आर्थिक दृष्ट्या समर्थ होण्याची संधी उपलब्ध होत आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांनी आज नागपूरच्या धापेवाडा येथे केले.

केंद्रीय उद्योग मंत्रालयाच्या विणकर सेवा केंद्रामार्फत धापेवाडा येथे  वस्त्रोद्योग क्षेत्रात  क्षमता वृद्धी आणि कौशल्य विकासाचे उद्दिष्ट ठेवणाऱ्या, ‘समर्थ’  योजनेअंतर्गत धापेवाडा येथील मेसर्स धापेवाडा टेक्स्टाईल प्रोडूसर कंपनी मार्फत विणकाम प्रशिक्षणाचे उद्घाटन आज गडकरी यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते.

विणकर सेवा केंद्रामार्फत संचालित या प्रशिक्षण केंद्रांमधून गुणवत्तापूर्ण उत्पादने तयार झाली पाहिजेत .यांची निर्यात आपण विदेशात करू शकू अशी आशा गडकरी यांनी यावेळी व्यक्त केली. या केंद्रांमधून 1 हजार महिला सध्या प्रशिक्षण घेत असून पुढच्या काळात या महिलांची संख्या 10 हजारावर नेण्याची आपला मानस असल्याचे गडकरी यांनी सांगितलं. हातमागाचे योगा मॅट, गालिचे यांचे चांगले डिझाईन तयार करून त्यांना स्थानिक बाजारपेठेत चांगली मागणी येण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजे असेही त्यांनी सांगितलं .हातमागाला पुन्हा भरभराटीचे दिवस मिळवून देण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केल.  उद्योगाच्या माध्यमातून विकसित  होणाऱ्या स्मार्ट सिटीच्या धरतीवरच हातमागासारख्या उद्योगाव्दारे स्मार्ट विलेज सुद्धा निर्माण झाल्या पाहिजे असे  त्यांनी सांगितलं.

याप्रसंगी काही निवडक विणकरांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला . महिला प्रशिक्षणार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप  तसेच प्रशिक्षण किटचे सुद्धा वाटप महिलांना करण्यात आले. गडकरी यांनी यावेळी प्रशिक्षण केंद्राची पाहणी करून तेथील उपकरणांची सुद्धा माहिती जाणून घेतली.

 

केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाचे सचिव उपेंद्र सिंग यांनी सांगितलं की, हातमाग भारतातील एका मोठ्या लोकसंख्येचे उपजीविकेचे साधन आहे.  या  कलेला संवर्धित करण्याचा निर्धार आपण केला पाहिजे .

विणकर सेवा केंद्राचे सहायक संचालक महादेव पौनिकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर केले आणि विणकर सेवा केंद्राच्या योजना बद्दल माहिती उपस्थितांना दिली. या कार्यक्रमाला धापेवाडातील ग्रामस्थ, विणकर सेवा केंद्राचे अधिकारी पदाधिकारी व स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते .