विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक हिवाळी अधिवेशनात नाही

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत राज्यपाल विरुद्ध ठाकरे सरकार असा संघर्ष दिसून आला. मंगळवारी (दि. 28) अधिवेशनाचा शेवटचा दिवस असल्याने निवडणूक होणार की नाही यावरुन अनेक चर्चा सुरू होत्या. दरम्यान आता या निवडणुकीच्या संदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. या हिवाळी अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक नाही. थोड्याच वेळापूर्वी महाविकास आघाडी सरकारची एक बैठक पार पडली. या बैठकीत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक न घेण्याचा निर्णय घेतला आहे.

प्राप्त माहितीनुसार, आज हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस असल्याने विधानसभा अध्यक्षपद निवडणूक घेण्यावर ठाकरे सरकार ठाम होते. मात्र, मविआ सरकारने राज्यपालांना लिहिलेल्या पत्रावर राज्यपालांकडून अद्याप कुठलाही निर्णय आला नाही. त्यानंतर राज्यपालांच्या अनुमतीशिवाय निवडणूक घेण्याची चाचपणीही केली. पण कुठल्याही कायदेशीर पेचात अडकू नये यासाठी राज्य सरकारने आज निवडणूक न घेण्याचं ठरवले आहे. विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक आज होणार नाही. त्यामुळे आता विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक कधी होणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीसाठी एक विशेष अधिवेशन बोलावले जाऊ शकते किंवा राज्य अर्थसंकल्पीय अधिवेशनात ही निवड होऊ शकते.