भुदरगड तालुक्यातील मेघोली तलाव दुर्घटना स्थळाची पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडून पाहणी व गावकऱ्यांशी संवाद
-
दुर्घटनेची चौकशी करुन दोषींवर कारवाई
-
प्रकल्पाचे बांधकाम तात्काळ करण्याच्या दृष्टीने आवश्यक ती कार्यवाही
-
नुकसानीचे पंचनामे आठ दिवसांत पूर्ण करा
-
पंचनाम्याबाबत तक्रार येणार नाही याची दक्षता घ्यावी
कोल्हापूर दि.4 : मेघोली लघु पाटबंधारे तलाव फुटल्यामुळे झालेल्या नुकसानग्रस्तांना तातडीने मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करु, असे आश्वासन देऊन या दुर्घटनेची चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे पालकमंत्री सतेज पाटील यांनी सांगितले.
भुदरगड तालुक्यातील मेघोली येथील लघु पाटबंधारे तलाव फुटल्याची घटना बुधवारी (1 सप्टेंबर) रात्री उशिरा घडली. हा प्रकल्प फुटल्यामुळे अचानक वाढलेल्या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्यामुळे एका व्यक्तीचा व काही जनावरांचा मृत्यू झाला. तसेच, शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पालकमंत्री श्री पाटील यांनी या घटनास्थळाला भेट देऊन गावकऱ्यांशी संवाद साधला, तसेच त्यांच्या अडीअडचणी जाणून घेऊन त्यांच्या मागण्यांचे निवेदन स्वीकारले. यावेळी, खासदार संजय मंडलिक, आमदार प्रकाश आबीटकर, प्र. उपविभागीय अधिकारी तथा तहसीलदार अश्विनी अडसूळ, पदाधिकारी, सरपंच, स्थानिक नागरिक उपस्थित होते.
पालकमंत्री सतेज पाटील यांनी मेघोली तलावाचा भराव वाहून गेलेल्या प्रत्यक्ष ठिकाणाला भेट देऊन संबंधित अधिकारी व गावकऱ्यांशी सविस्तर चर्चा केली. तसेच नुकसानग्रस्तांना दिलासा देण्याचे काम शासन करेल, असे सांगितले.
पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, या भागातील शेतकरी व गावकऱ्यांची पाण्याची सोय जलद होण्यासाठी या प्रकल्पाचे बांधकाम तात्काळ करण्याच्या दृष्टीने गतीने कार्यवाही करण्यात येईल. या दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांच्या वारसांना तातडीने मदत मिळवून देणे तसेच मयत जनावरे व शेतीची नुकसान भरपाई देण्यासाठीही सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील, असे सांगून प्रशासनाने येत्या आठ दिवसांत नुकसानीचे पंचनामे पूर्ण करावेत, पंचनाम्यांबाबत कोणाचीही तक्रार येणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा सक्त सूचना पालकमंत्री श्री. पाटील यांनी केल्या.
आमदार प्रकाश आबिटकर म्हणाले, नुकसानग्रस्त एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहत कामा नये, यासाठी वस्तुनिष्ठ पंचनामे करावेत. गतीने पंचनामे होण्यासाठी ड्रोनचा वापर करावा व पंचनाम्यांची यादी दर्शनी भागात लावून गावकऱ्यांच्या सूचना घ्याव्यात. तलावाचे पाणी वेगाने बाहेर पडून शेतात घुसल्यामुळे शेतात मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे, हा गाळ काढून घेण्याला प्राधान्य द्यावे. विहिरी, ओढ्याच्या पात्राची दुरुस्ती तसेच पाणी उपसा मोटारी दुरुस्त करुन घ्याव्यात.
मेघोली लघु पाटबंधारे तलावाचा एकूण पाणीसाठा 2.790 दशलक्ष घनमीटर असून प्रकल्पीय उपयुक्त साठा 2.54 दशलक्ष घनमीटर आहे. मेघोली तलावाचा भराव वाहून गेल्यामुळे नवले गावातील जिजाबाई मोहिते (वय 55वर्षे) या महिलेचा मृत्यू झाला. शिवाय काही जनावरे दगावली. या परिसरातील शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. मेघोली, नवले, ममदापूर, वेंगुरुळ, सोनूर्ली, तळकरवाडी आदी गावातील शेतीमध्ये पाणी शिरले तसेच ओढ्या- नाल्यांना पूर आला. प्रशासनाच्या वतीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम जलद गतीने सुरु आहे, अशी माहिती तहसीलदार अश्विनी अडसूळ यांनी दिली.