Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

शेतीला शाश्वत आणि फायदेशीर बनवण्यासाठी बहुआयामी प्रयत्न आवश्यक

शेतकर्‍यांना उत्पन्नाची सुरक्षा सुनिश्चित केल्यामुळे  आचार्य रंगा यांच्या आकांक्षा साध्य करण्यास मदत होईलः उपराष्ट्रपती

उपराष्ट्रपती  एम. व्यंकय्या नायडू यांनी आज भारतीय शेतीला शाश्वत आणि फायदेशीर बनवण्यासाठी बहुआयामी प्रयत्नांची गरज व्यक्त केली. ते म्हणाले की, आपला दृष्टिकोन आणि पद्धती बदलून आपण कमी क्षेत्रात अधिक उत्पादन घेऊ शकू.

रंगा ट्रस्टच्या वतीने आयोजित आचार्य एन.जी. रंगा यांच्या 120 व्या जयंती समारंभाचे उद्घाटन करताना नायडू यांनी त्यांचे वर्णन एक महान स्वातंत्र्यसेनानी, शेतकरी नेते, समाजसुधारक आणि उत्कृष्ट संसदपटू असे केले. “स्वामी सहजानंद सरस्वती यांच्यासह  भारतीय किसान चळवळीचे जनक म्हणून ओळखले जाणारे ते या देशाचे खरे सुपुत्र आहेत .” ते पुढे म्हणाले की, सर्व शेतकर्‍यांना उत्पन्न सुरक्षा सुनिश्चित केल्यामुळे आचार्य रंगा यांच्या आकांक्षा साध्य करण्यास मदत होईल, शेतकर्‍यांचे कल्याण होईल.

आचार्य रंगा यांच्याशी असलेल्या वैयक्तिक संबंधांची आठवण सांगताना उपराष्ट्रपती म्हणाले की, आचार्य एन.जी. रंगा यांचे जीवन आणि त्यांच्या दृष्टीकोनाचा त्यांच्यावर मोठा प्रभाव होता. त्यांना सन्मानाचे प्रतीक म्हणून संबोधित करताना नायडू म्हणाले की आचार्य रंगांसाठी राजकारण आणि सार्वजनिक जीवन हे एक मिशन होते आणि त्यांनी नेहमीच मूल्यवर्धित राजकारणाचे अनुसरण केले.

आचार्य रंगा यांच्या उच्चस्तरीय वादविवाद आणि संसदीय वर्तनाबाबत बोलताना ते म्हणाले की, जेव्हा आचार्य रंगा संसदेत बोलायचे तेव्हा त्याकडे सर्वांचे लक्ष असायचे. नायडू पुढे म्हणाले की, राज्यसभेचे  अध्यक्ष या नात्याने चर्चेचा दर्जा खालवताना पाहून मला वेदना होतात.

उपराष्ट्रपती म्हणाले की, आचार्य रंगा हे संसदेतील शेतकऱ्यांचा आवाज होते आणि आपल्या शेतकर्‍यांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळाले पाहिजे याची काळजी घेण्यावर त्यांनी नेहमीच भर दिला.

पारंपारिक ज्ञान आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानामध्ये प्रभावी ताळमेळ राखण्याचे त्यांनी आवाहन केले.

अधिक हवामान-अनुकूल बियाण्यांचे वाण विकसित करण्याचे आवाहन करत नायडू यांनी ठिबक सिंचन, ड्रोन आणि सेन्सर वापरुन अचूक-कृषी पद्धतींचा अवलंब करण्याची गरज व्यक्त केली.

जपानसारख्या देशांमध्ये कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता वापर होत असल्याकडे लक्ष वेधत ते म्हणाले की, “अशा तंत्रज्ञानाचा देशात प्रयोग करण्यात आपण मागे राहू नये.”

या महामारीच्या कालावधीत कृषी क्षेत्राने उत्तम  कामगिरी केल्याबद्दल उपराष्ट्रपतींनी आनंद व्यक्त केला.

ते म्हणाले की ग्राहकांची आहारात उच्च पातळीचे पोषण मिळावे अशी अपेक्षा होती. “कृषी क्षेत्रातील नवोदित उद्योजकांसाठी ही उत्तम संधी असून  उत्पादकांनाही फायदेशीर आणि स्थिर उत्पन्न मिळेल”.

गेल्या काही दशकांत हवामानाच्या लहरीपणात वाढ झाल्याबद्दल चिंता व्यक्त करताना ते म्हणाले की प्रत्येक प्रतिकूल घटनेत शेतकऱ्याला सर्वाधिक फटका बसतो.

उपराष्ट्रपतींनी शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी सरकारने केलेल्या उपाययोजनांचे कौतुक केले, ते म्हणाले, “सरकारच्या ई-एनएएम पोर्टलसारख्या चांगल्या किंमतीचा शोध घेणारे उपक्रम प्रशंसनीय आहेत आणि आपण शेतकऱ्यांना कुठे, केव्हा आणि कुणाला विकायचे याचा निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य दिले पाहिजे”.

आपल्या बर्‍याच कृषी पद्धतीमुळे मातीची गुणवत्ता खालावत असल्याबद्दल चिंता व्यक्त करताना उपराष्ट्रपतींनी मृदा आरोग्य कार्डाच्या वापराद्वारे रासायनिक खतांवरील अवलंबत्व कमी करण्याचे आवाहन  केले.

तसेच कृषी विद्यापीठांनी शेतकऱ्यांना फायदा होईल अशा संशोधनावर लक्ष केंद्रित करण्याचे त्यांनी आवाहन केले. “लॅब-टू-लँड हा कृषी विद्यापीठांचा मंत्र असावा”, यावर नायडू यांनी भर दिला.

काळाच्या ओघात होणारे बदल आणि अनिश्चितता याचा सामना करण्यासाठी त्यांनी शेतकऱ्यांना  ‘नवसंशोधन, निर्मिती आणि प्रोत्साहन ’ हा मंत्रही दिला.

Exit mobile version