देशातली 19 मेगा फूड पार्क्स, अंमलबजावणीच्या विविध टप्यावर असून त्यांचे काम लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री पशुपती कुमार पारस यांनी म्हटले आहे. अन्न प्रक्रियेला आधुनिक पायाभूत सुविधा पुरवण्याबरोबरच शेत ते बाजारपेठ अशी मूल्य साखळी देण्याचा या योजनेचा प्राथमिक उद्देश आहे. मंत्रालयाने देशातल्या 38 मेगा फूड पार्क्सना अंतिम मंजुरी दिली असून 3 मेगा फूड पार्क्सना तत्वतः मान्यता दिली आहे. यापैकी 22 मेगा फूड पार्क प्रकल्प कार्यान्वित झाले असल्याचे त्यांनी प्रसार माध्यमाशी बोलताना सांगितले. मंत्रालयातल्या वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी संवाद साधल्यानंतर ते बोलत होते. अन्न प्रक्रिया उद्योग सचिव पुष्पा सुब्रमण्यम या संवादावेळी त्यांच्या समवेत उपस्थित होत्या.
शेतकऱ्यांच्या उत्पन्नाला जोड देण्यासाठी आंबा, केळी, सफरचंद, अननस, गाजर, फ्लॉवर यासारख्या 22 नाशिवंत फळे आणि भाज्यांच्या मूल्य वर्धनाला चालना देण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. टोमाटो, कांदे, बटाटे यावरून 22 नाशिवंत वस्तूंपर्यंत ‘ऑपरेशन ग्रीन स्कीम’ची व्याप्ती वाढवण्यात आल्याचे 2021-2022 च्या अर्थसंकल्पीय भाषणात सरकारने जाहीर केले आहे.
संसदेच्या नुकत्याच झालेल्या सत्रात अन्न तंत्रज्ञान, उद्योजकता आणि व्यवस्थापन राष्ट्रीय संस्था विधेयक 2021 मंजूर झाल्यानंतर ते अधिसूचित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे, अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालया अंतर्गत हरियाणातल्या कुंदाली इथली अन्न तंत्रज्ञान, उद्योजकता आणि व्यवस्थापन राष्ट्रीय संस्था (एनआयएफटीईएम) आणि तामिळनाडूतल्या तंजावूर इथली भारतीय अन्न प्रक्रिया उद्योग संस्था आता राष्ट्रीय महत्व असलेल्या संस्था झाल्या आहेत. या महत्वपूर्ण पावलाबद्दल पारस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले.