गौतम अदानी आता मुकेश अंबानींना मागे टाकून आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहे. ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार, 59 वर्षीय अदानी यांची एकूण संपत्ती 88.5 अब्ज डॉलर (6628.65 अब्ज रुपये) झाली आहे तर अंबानींची एकूण संपत्ती 87.9 अब्ज डॉलर (6583.71 अब्ज रुपये) आहे.
ब्लूमबर्गच्या मते, अदानी यांच्या संपत्तीत 12 अब्ज डॉलरची (898.80 अब्ज रुपये) वाढ झाली आहे. अदानी या वर्षी जगातील सर्वात जलद कमाई करणारे अब्जाधीश झाले आहेत. त्याच वेळी, अंबानींची एकूण संपत्ती 2.07 अब्ज डॉलरने घसरली आहे. आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनण्यासोबतच गौतम अदानी हे जगातील टॉप 10 श्रीमंत व्यक्तींच्या यादीतही आले आहेत, तर मुकेश अंबानी या यादीतून बाहेर पडले आहेत. श्रीमंतांच्या या यादीत अंबानी 11 व्या क्रमांकावर आहेत. टेस्लाचे सीईओ एलोन मस्क $235 अब्ज संपत्तीसह पहिल्या क्रमांकावर आहेत.
गौतम अदानी यांनी एका छोट्या कमोडिटी ट्रेडिंग कंपनीसह व्यवसाय सुरू केला, ज्याचा विस्तार त्यांनी अनेक बंदरे, खाणी आणि ग्रीन एनर्जीपर्यंत केला. सध्या बंदरे, खाणी, ग्रीन एनर्जी यासह अनेक क्षेत्रात अदानीचा व्यवसाय आहे. गौतम अदानी यांनी अक्षय उर्जेच्या क्षेत्रात तसेच विमानतळ, डेटा सेंटर्स आणि संरक्षण सौद्यांचा व्यवसाय वाढवला. गेल्या दोन वर्षांत अदानी कंपनीच्या शेअर्समध्ये जवळपास 600% वाढ झाली आहे.