Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

कृषी उत्पन्न वाढीसाठी मागेल त्या शेतकऱ्याला ठिबक सिंचन

कृषी उत्पन्न वाढीसाठी तसेच मातीचा पोत सुधारण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने आपले कृषी  क्षेत्र ठिबक सिंचनाखाली (drip irrigation system ) आणावे. मागणी करणाऱ्या शेतकऱ्याला कृषी विभागामार्फत ठिबक सिंचन यंत्रणा दिली जाईल, असे प्रतिपादन कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी केले.

किन्हई येथे श्री. भुसे यांच्या हस्ते पिक स्पर्धेत विजेत्या शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला आमदार महेश शिंदे, प्रा. नितीन बानुगडे-पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गुरुदत्त काळे, राहूल बर्गे तसेच शेतकरी उपस्थित होते.

श्री.भुसे म्हणाले, सेंद्रीय शेतीचे प्रमाणिकरणासाठी कृषी विद्यापीठांना सोबत घेऊन कृषी विभागात स्वतंत्र कक्ष कार्यान्वीत करण्यात येईल. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी  खंबीरपणे उभे असून शेतकरी गट, महिला बचत गट यांना कृषी विभागामार्फत आवश्यक मदत केली जाईल. शेतकरी महिलांसाठी कृषी विभागाच्या 30 टक्के योजना आहेत त्याचाही महिला शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा.

कोरोना संसर्गामुळे देशासह राज्यात निर्बंध घालण्यात आले होते. या निर्बंधाच्या काळात देशाची अर्थव्यवस्था संभाळण्यामध्ये शेतकऱ्यांचा मोठा वाटा आहे. शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाच्या अनेक योजना असून त्यांचा प्रत्येक शेतकऱ्याने लाभ घ्यावा. शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी जे-जे शक्य आहे ते शासनाकडून केले जाईल, अशी ग्वाही कृषी मंत्री श्री.भुसे यांनी यावेळी दिली.

आमदार श्री. शिंदे म्हणाले, सातारा जिल्ह्यात कृषी विभागाचे काम चांगल्या पद्धतीने सुरु आहे. शेतकऱ्यांनी शेतीपूरक व्यवसायाकडेही वळले पाहिजे. शेतकऱ्यांनी शेततळे घेऊन त्यात मस्त्य शेती करावी.

Exit mobile version