Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

बहुआयामी, हरहुन्नरी डॉ. अनिल अवचट यांचं निधन

समाजासाठी भरीव योगदान देणारे बहुआयामी व्यक्तिमत्व

साहित्यातून, पत्रकारितेतून सामाजिक कार्याचा डोंगर उभा करता येतो, याचे आदर्श उदाहरण ज्येष्ठ साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट यांनी घालून दिले. सेवाव्रत सामाजिक कार्यकर्ता, मनस्वी साहित्यिक आणि हाडाचा पत्रकार अशा बहुआयामी व्यक्तिमत्वाचे आपल्यातून निघून जाणे क्लेशदायक असल्याची प्रतिक्रिया व्यक्त करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, साहित्यिक डॉ. अनिल अवचट यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

डॉ. अवचट यांनी मराठी पत्रकारिता आणि साहित्यिक प्रवासात आपल्या अनोख्या लेखनशैलीची महत्त्वपूर्ण अशी भर घातली. त्याचबरोबरीने त्यांनी सामाजिक कार्य आणि सामाजिक चळवळीतही हिरीरीने सहभाग घेतला. व्यसनमुक्ती, मानसिक आरोग्य या क्षेत्रात त्यांनी संस्थात्मक आणि भरीव असे योगदान दिले आहे. त्यांचे चौफेर लेखन आणि साहित्यकृती, सामाजिक कार्य हे पुढच्या कित्येक पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल असे आहे. त्यांचे हे योगदान महाराष्ट्र सदैव स्मरणात ठेवेल. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, साहित्यिक डॉ. अनिल अवचट यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

 

उपमुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली

मुंबई, दि २७ :- “ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, साहित्यिक डॉ. अनिल अवचट कृतिशील विचारवंत होते. समाजातील संवेदनशील प्रश्नांवर त्यांनी स्पष्ट विचार मांडले. लोकहितासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलन केलं. ‘मुक्तांगण’च्या माध्यमातून हजारो बांधवांना व्यसनमुक्त केलं. व्यसनमुक्ती चळवळीतील त्यांचं कार्य, त्यांनी केलेले प्रयोग अन्य देशांसाठी प्रेरणादायी, मार्गदर्शक ठरले. वैद्यकीय तज्ज्ञ, पत्रकार, लेखक, चित्रकार, शिल्पकार, विचारवंत, सामजिक कार्यकर्ता असं बहुआयामी जीवन समरसून जगणाऱ्या हरहुन्नरी डॉ. अनिल अवचट यांचं निधन ही महाराष्ट्राच्या सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक चळवळीची मोठी हानी आहे. डॉ. अवचट यांच्या कुटुंबियांच्या,  ‘मुक्तांगण’ परिवाराच्या दुःखात मी सहभागी आहे. मी डॉ. अनिल अवचट यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार  यांनी डॉ. अनिल अवचट यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करून श्रद्धांजली वाहिली.

Exit mobile version